Elon Musk's SpaceX Inspiration 4 : जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सनं आज इतिहास रचला आहे. कंपनीने पहिल्यांदा चार सामान्य लोकांना अंतराळात पाठवलं आहे. फ्लोरिडामधील नासाच्या कॅनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. मात्र यावर नियंत्रण स्पेसएक्स ठेवत होती. तीन दिवसांच्या या मोहिमेला 'इंस्पिरेशन फोर' (Inspiration 4) असं नाव देण्यात आलं आहे. तीन दिवस अंतराळात राहिल्यानंतर हे अवकाशयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणार आहे.
2009 नंतर पहिल्यांदाच घडला इतिहास
हे अंतराळवीर 357 मैल म्हणजेच, सुमारे 575 किलोमीटर उंचीवर जाणार आहेत. 2009 नंतर पहिल्यांदाच मानव इतक्या उंचीवर जात आहे. मे 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर जाऊन हबल दुर्बिणीची दुरुस्ती केली होती. अशातच स्पेस एक्सच्या या मोहिमेचा मूळ हेतू अमेरिकेतील सेंट जुडे चिल्ड्रन्स रिसर्च रुग्णालयासाठी निधी गोळा करणं आहे. तसेच कर्करोगाविषयी लोकांना जागरूक करणे हे या मिशनचे ध्येय आहे.
सकाळी 5.33 वाजता रवाना झालं अंतराळयान
भारतीय वेळेनुसार, गुरुवारी म्हणजेच, आज सकाळी पाच वाजून 33 मिनिटांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटरमधून चार सामान्य नागरिकांना घेऊन स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन कॅप्सूल फाल्कन-9 रॉकेटमधून अंतराळ प्रवासासाठी रवाना झालं. इतिहासात पहिल्यांदाच हे अवकाशयान केवळ सामान्य नागरिकांसह पृथ्वीच्या कक्षेत लॉन्च करण्यात आलं आहे.
अंतराळात गेलेल्या व्यक्तींपैकी सर्वजण सामान्य नागरिक
अंतराळात ज्या चार व्यक्तींना पाठवलं आहे. त्यांच्यापैकी एकही व्यक्ती प्रोफेशनल नाही. या सर्व व्यक्ती सामान्य व्यक्ती आहेत. या व्यक्तिंना केवळ पाच महिन्यांसाठी ट्रेनिंग देण्यात आली आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स ज्या स्पेसशिपमधून या सामान्य नागरिकांना अंतराळ प्रवासासाठी धाडणार आहे, त्या स्पेसशिपची (अंतराळ यान) अनेक वैशिष्ट्य आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :