इस्लामविरोधी ट्वीट महागात, भारतीय वंशाच्या शेफला कामावरुन काढलं
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2018 09:09 AM (IST)
संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका शेफला इस्लामविरोधी ट्वीटमुळे आपली नोकरी गमावावी लागली आहे.
दुबई : संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका शेफला इस्लामविरोधी ट्वीटमुळे आपली नोकरी गमावावी लागली आहे. अतुल कोचर असं या 48 वर्षीय शेफचं नाव असून मिशेलिन स्टार मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत. मिशेलिन स्टार जगभरातील हॉटेल्स आणि शेफसाठीची रेटिंगप्रणाली आहे. अतुल कोचर जेडब्ल्यू मॅरीएटच्या मारक्विस हॉटेलमधील रंगमहल रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. प्रियंका चोप्राच्या 'क्वॉन्टिको’ सीरिजमध्ये भारतीय देशभक्तांना दहशतवाद्यांच्या भूमिकेत दाखवल्याचं म्हणत अतुल कोचर यांनी क्वॉन्टिकोवर टीका केली होती. अतुल कोचर यांनी ट्वीट केलं होतं की, “हे पाहून मला खूप दु:ख होत आहे की प्रियंकाने हिंदूंच्या भावनांचा आदर केला नाही, जे 2000 सालापूर्वीपासून इस्लामी दहशतवादाचे शिकार बनले आहेत.” वादानंतर कोचर यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. पण तोपर्यंत त्यांना आपली नोकरी गमावावी लागली. यानंतर त्यांनी आपण ट्वीट करुन फार मोठी चूक केल्याचं म्हटलं आहे आणि माफीही मागितली आहे. अतुल कोचर यांच्या इस्लामविरोधी ट्वीटने सोशल मीडियावर वेगळ्याच वादाला तोंड फुटलं आहे. तसंच त्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर शेफ अतुल कोचर यांना रंगमहल रेस्टॉरंटने करार संपवून कामावरुन काढून टाकलं आहे. जेडब्ल्यू मॅरिएटच्या या भूमिकेमुळे निराश झालेल्या अतुल कोचर यांनी केलेल्या ट्वीटबद्दल माफी मागत आपल्या विधानामुळे हॉटेल प्रशासनाला झालेल्या त्रासाला आपण जबाबदार असल्याचं म्हणलं आहे.