मॉस्को : फिफा विश्वचषकादरम्यान दंगलसदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून, रशिया सरकारने अचाट उपाय शोधला आहे. 2018 सालच्या फुटबॉल विश्वचषकादरम्यान, जो कोणी दारु पिऊन धिंगाणा घालेल, त्याला नग्न करुन, खुर्चीत बांधून ठेवण्यात येईल.
यंदा फ्रान्समध्ये झालेल्या युरो चषकाच्या कालावधीत इंग्लिश आणि रशियन फुटबॉलरसिकांमध्ये उसळलेल्या दंगलींनी दोन्ही देशांच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं. 2018 सालच्या फिफा विश्वचषकाच्या कालावधीत ती दंगलसदृश परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यजमान रशियानं विशेष खबरदारी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे.
दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या इंग्लिश फुटबॉल रसिकांच्या पाहुणचारासाठी रशियात खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या हुल्लडबाजांना आटोक्यात आणण्यासाठी विश्वचषक सामन्यांच्या शहरात खास कोठड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
विश्वचषक सामन्यांदरम्यान दारु पिऊन धिंगाणा घातल्यास, त्या हुल्लडबाजांना विवस्त्र करून पलंगाला बांधून ठेवण्याचा अधिकार सुरक्षायंत्रणांना देण्यात येईल. सदर हुल्लडबाजाची नशा जोवर उतरत नाही, तोवर त्याला त्याच अवस्थेत बांधून ठेवण्यात येईल. 2008 साली युएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलच्या दिवशी रशियानं मॉस्को शहरात ही उपाययोजना केली होती.