Drone Attack On Iraqi PM's Residence : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या बगदाद येथील घरावर ड्रोनद्वारे हल्ला झाला आहे. इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून सुरक्षित बचावले आहेत. या हल्ल्यांमध्ये काही लोक जखमी झाले आहेत. इराक लष्करानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ड्रोन हल्ला कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या हल्ल्याची जबाबदारीही अद्याप कोणत्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. इराक लष्कराकडून या हल्ल्याचा तपास सुरु आहे.
रविवारी सकाळी इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या ग्रीन झोन बगदाद येथील घरावर ड्रोनद्वारे हल्ला झाला. ड्रोनद्वारे स्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याचं इराक लष्कारानं सांगितलं. या हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचं समजतेय. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी पूर्णपणे सुरक्षित आहेत. इराक लष्कराकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला? याबाबतची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी ट्विट करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. देशासाठी शांती ठेवा, असं अवाहन पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटद्वारे इराकच्या जनतेला केलेय. मार्च 2020 मध्ये मुस्तफा अल-कदीमी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे स्विकारली होती.