मुंबई : तुम्ही जन्मतः डोळे उघडायच्या आत निर्धास्त विश्वासानं आईच्या उबदार कुशीत शिरता... निसर्गातले सगळे जीव माणसासारखे नशीबवान नसतात... बार्नेकल गुस म्हणजे हंसाच्या पिलांचा एक व्हिडिओ पाहिल्याचं आठवतंय?


जन्मल्या जन्मल्या कड्याच्या टोकावरुन आईच्या आवाजाच्या दिशेने 400 फूट खोल खडकाळ दरीत स्वतःला झोकून देणारी पिलं पाहून काळजाचा ठोका चुकतोच चुकतो, या भयानक परीक्षेतून वाचणारी पिलंच पुढे आयुष्याच्या परीक्षेत बसण्यासाठी पात्र असतात...

काहीसा असाच प्रकार मरिन इगुआना म्हणजेच पाणघोरपडींबाबत घडतो, अंड्यातून बाहेर आल्या आल्या खडतर परीक्षा त्यांची वाट पाहात असते..

कुठला आहे हा व्हायरल व्हिडिओ ?


हा सगळा प्रसंग घडतो गॅलापागोस द्वीप समुहातल्या फर्नांडिना बेटाजवळ, 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' हा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनला याच बेटावर दिसला सुचला... त्याच सिद्धांताचं थरारक रुप बीबीसी वनच्या प्लॅनेट अर्थ या मालिकेत पाहायला मिळालं, सर डेव्हिड अटनबरो यांनी पृथ्वीची- निसर्गाची थक्क करणारी रुपं या मालिकेत दाखवली.

डेव्हिड अटनबरो वय वर्ष फक्त 90 – गांधी, ज्युरासिक पार्क सिनेमामुळे आपल्या परिचयाचे झालेले रिचर्ड अटनबरोचे धाकटे भाऊ. त्यांच्या कॅमेरामनने या बेटाबद्दल त्यांना माहिती दिली आणि त्यांचा क्रु इथे धडकला, जे पाहायला मिळालं ते भयानक होतं.

काय आहे या व्हिडिओत ?


भक्ष्य आणि भक्षक :

मरिन इगुआना म्हणजेच पाणघोरपडी प्रशांत महासागराच्या किनारी वाळूत अंडी घालतात, जून महिन्यात या अंड्यातून पिलं बाहेर यायला सुरुवात होते. पिलं वाळूतून बाहेर यायच्या वेळी असंख्य रेसर साप दबा धरुन बसतात, रेसर साप हा कमी विषारी साप आहे, जसजशी पिलं बाहेर येऊ लागतात, त्यांना खाण्यासाठी रेसर सापांमधे स्पर्धा लागते.

जीवाच्या आकातांने वाळूतून पळणारी घोरपडीची छोटी पिलं आणि तिचा पाठलाग करणारे पाच-पंचवीस रेसर साप हे दृश्य या वर्षातलं सगळ्यात थरारक ठरु शकतं...

या बेटावर अनेक पिलं सापांचं भक्ष्य बनतात पण काही मृत्यूला मात देतात. या सापांच्या तावडीतून सुटलेलं हे पिलू नशीबवान होतंच पण जिद्दी, चिवटही होतं, जगण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर संकटांना कसं मागं टाकता येतं हेच, या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं.

बॉन्डच्या चित्रपटात पाठलागाचे थरारक सीन्स तुम्ही अनेकदा पाहिले असतील, एन्जॉय केले असतील. व्हिडिओत जे दिसतं, तिथे रिटेकला वाव नाही...

तात्पर्य काय, तर प्रत्येकाला दुसरी संधी मिळतेच असं नाही. कारण हा चित्रपट नाहीय हे आहे खरं खुरं आयुष्य, याला जीवन ऐसे नाव.

पाहा व्हिडिओ :