Donald Trump Disqualified From Presidency: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा झटका बसला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणी (Capitol Hill Violence Case) कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केलंय. अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकलं आहे. 


अमेरिकेतील एका न्यायालयानं डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केलं आहे. अमेरिकेतील कॅपिटल हिल हिंसाचारात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची भूमिका पाहता न्यायालयानं हा निर्णय दिला. अमेरिकेतील कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयानं (भारतातील उच्च न्यायालयाप्रमाणे) ट्रम्प यांच्या विरोधात हा निर्णय दिला आहे. 


पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प सहभागी होऊ शकत नाहीत, असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. मात्र, या निर्णयाविरोधात ट्रम्प अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात जातील, अशी आशा आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी 4-3 असा निकाल देत ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केलं आहे. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत सामील होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला अपात्र घोषित करण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.


कॅपिटल हिंसाचार प्रकरण, ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ 


निवडणुकीतील पराभवामुळे नाराज झालेल्या आणि त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसद कॅपिटल हिलला घेराव घातला होता. घेराव घातल्यानंतर ट्रम्प समर्थक आत घुसले आणि त्यांनी हल्ला केला. अमेरिकन संसदेवर गोळीबार आणि तोडफोड केल्यानंतर अनेक कार्यालयांवर कब्जा करण्यात आला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर वॉशिंग्टनमध्ये सार्वजनिक आणीबाणी जाहीर करण्यात आली.


पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केलेली चिंता 


अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती. वॉशिंग्टन डीसीमधील हिंसाचार आणि अशांततेच्या बातम्यांमुळे दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सत्तेचं हस्तांतरण योग्य आणि शांततेनं होणं महत्त्वाचं आहे. अशा निदर्शनातून लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचू शकत नाही.