Milk Crate Challenge : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा विविध चॅलेन्ज देण्यात येत असून ते व्हायरल होतात. आता तशाच प्रकारचं 'मिल्क क्रेट चॅलेन्ज' हे  सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते लोकांसाठी जीवघेणं ठरत आहे. लोकांनी हे अशा प्रकारचे चॅलेन्ज स्वीकारुन आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. दुधाच्या पिशव्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट्स एकमेकांवर ठेवायचं आणि त्यावर आपल्या शरीराचा समतोल साधत चढायचं अशा प्रकारचे हे मिल्क क्रेट चॅलेन्ज आहे. 


अमेरिकेत आणि युरोपिय देशांत टिकटॉक आणि इतर सोशल मीडियामध्ये मिल्क क्रेट चॅलेन्जच्या व्हिडीओंची संख्या वाढत असून हे चॅलेन्ज चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे जो-तो हे चॅलेन्ज स्वीकारण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे अनेकांना मोठ्या दुखापतीला सामोरं जावं लागत आहे. 


 






अनेक व्हिडीओंचा शेवट हा संबंधित व्यक्ती त्या क्रेटवरुन खाली पडून होत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला शारीरिक इजा होत असल्याचं दिसून येत आहे. अनेकजणांच्या डोक्यालाही जबर मार बसल्याचं दिसून आलं आहे तर काहीजणांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. हे व्हायरल होत असलेलं मिल्क क्रेट चॅलेन्ज लोकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे अशा प्रकारचं आव्हान स्वीकारून लोकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे. 


नेमकं काय आहे हे मिल्क क्रेट चॅलेन्ज? 
टिकटॉक वरुन सुरु झालेलं हे चॅलेन्ज आता फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर चांगलंच व्हायरल होत आहे. या चॅलेन्जमध्ये दुधाच्या पिशव्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट्स एकमेकांवर एक पिरॅमिडप्रमाणे ठेवण्यात येतात. त्याच्या एका बाजूने, कोणत्याही आधाराशिवाय त्यावर चढण्यास सुरुवात केली जाते आणि दुसऱ्या बाजूने उतरण्यात येतं. म्हणजे याची रचना ही एका शिडीसारखी असते. हे चॅलेन्ज शरीराच्या संतुलनावर आधारित आहे. जो व्यक्ती असं संतुलन ठेऊन क्रेट्सच्या सर्वात वरच्या भागात पोहोचतो तो जिंकतो. 


 






संबंधित बातम्या :