इस्लामाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर शाहीद आफ्रिदीला धमकी दिली आहे. दाऊदने आफ्रिदीला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली असून, अधिक बोलल्यास परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहा, असेही दाऊदने आफ्रिदीला बजावले आहे.


दाऊदचा व्याही जावेद मियाँदाद आणि आफ्रिदी यांच्यामध्य मॅच फिक्सिंगवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावरुन दाऊदने आपला व्याही मियाँदादची बाजू घेत आफ्रिदीला धमकावले आहे.

मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन पाकिस्तानमधील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांवर टीका करत आहेत. या सर्व प्रकरणावरुन दाऊद संतापून आफ्रिदीला तोंड बंद करण्याची धमकीच दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 12 ऑक्टोबरला रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास दाऊदने आफ्रिदीला फोन केला आणि "आपलं तोंड बंद ठेव. अन्यथा परिणामांना सामोर जा.", अशी धमकी दिली.

आफ्रिदीने कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. मात्र, टी-20 सामन्यांमधून सन्मानपूर्वक निवृत्ती हवी असल्याचे आफ्रिदीचे म्हणणे आहे. मात्र, पाकिस्तानचा प्रशिक्षक जावेद मियाँदादच्या मते पैशाच्या हव्यासापोटी आफ्रिदी अशाप्रकारचा सामन्याची मागणी करत आहे. एवढंच नव्हे, तर मियाँदादने आफ्रिदीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही लावला आहे.