‘डी-कंपनी’च्या तिजोरीची ‘चावी’ सापडली, दाऊदचा हस्तक अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2018 10:23 AM (IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हणजे क्रूरकृत्यांचा समानार्थी शब्द. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊद इब्राहिम ‘मोस्ट वाँटेड’ आहे.
लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जाबिर मोतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणांनी लंडनमध्ये जाबिर मोतीवर कारवाई केली. पाकिस्तानी नागरिक असलेला जाबिर मोती हा ‘डी-कंपनी’च्या तिजोरीचा सर्वेसर्वा आहे. दाऊदचे आर्थिक व्यवहार जाबिर मोती पाहतो. शिवाय, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातही दाऊदचं काम जाबिरच पाहतो. जाबिर मोती ब्रिटनमध्ये राहत होता. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावई जुनैद (माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा) यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीनंतर हिल्टन हॉटेलमधून जाबिर मोतीला ताब्यात घेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हणजे क्रूरकृत्यांचं दुसरं नाव. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊद इब्राहिम ‘मोस्ट वाँटेड’ आहे. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागानेही 2013 साली दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते. अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली, हत्या, धमकी यांसारखे शेकडो आरोप, गुन्हे, तक्रारी दाऊदविरोधात आहेत. दरम्यान, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपलेला असल्याचे वृत्त अनेकदा आले आहेत. मात्र पाकिस्तान सरकारने कायमच हे वृत्त फेटाळले आहेत.