इस्लामाबाद : माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान  खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सकाळी पावणेअकरा वाजता इस्लामाबादमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी इम्रान  खान यांनी शपथ दिली.


भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सिद्धू हे या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते. सिद्धू यांच्या व्यतरिक्त माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनादेखील शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण होतं. पण वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आमंत्रण नाकारलं.


सिद्धू यांनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना भेट म्हणून काश्मिरी शाल नेली आहे. तसेच भारताचा सदिच्छादूत या नात्यानं आपण पाकिस्तानसाठी प्रेमसंदेश घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी सिद्धू म्हणाले की, "मी माझ्या मित्राच्या आमंत्रणामुळे पाकिस्तानात आलो आहे. माझ्या हा क्षण खुप खास आहे. खेळाडू आणि कलाकार देशांमधील अंतर मतभेद मिटवतात. मी पाकिस्तानात प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे."


पाकिस्तान निवडणुकीत काय झालं?
पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इम्रान  खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इम्रान  यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला. पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी 96 जागा जिंकल्या. तर बिलावर भुट्टो जरदारी यांच्या पाकिस्ताना पीपल्स पार्टीने 54 जागा जिंकल्या. पंतप्रधान निवडीसाठी पाकिस्तानातील नॅशनल अॅसेंबलीमध्ये शुक्रवारी मतदान झालं. यात इम्रान खान यांनी 176 मतं मिळवून पंतप्रधानपदी आपलं नाव कोरलं.