Coronavirus in UK : ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी 24 तासांमध्ये एक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पहिल्यांदाच दैनंदिन आकडा एक लाखाहून अधिक नोंदवण्यात आला. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन वेगाने फैलावत आहे. युरोपीयन देशांपैकी ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रमाणात संसर्ग फैलावला आहे. कोरोना महासाथीचा आजार सुरू झाल्यापासून ब्रिटनमध्ये आतापर्यंत एक लाख 47 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 दशलक्षजणांना बाधा झाली आहे.
ब्रिटनमध्ये बुधवारी मागील 24 तासांमध्ये एक लाख सहा हजार 122 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने सरकारने नागरिकांना लशीचा तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 30 दशलक्ष नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 37,101 बाधित आढळले आहेत. या दरम्यान, ब्रिटनने पाच ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे.
अॅण्टीव्हायरलची खरेदी
ब्रिटिश सरकारने बुधवारी सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनसोबत लढण्यासाठी आणखी लाखो अॅण्टीव्हायरल खरेदी केले आहेत. या बाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून हे औषध उपलब्ध होणार आहेत. हे अॅण्टीव्हायरल ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.
भारतातही खबरदारीच्या उपाययोजना
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यानं केंद्रासह राज्य सरकारंही पावलं उचलताना दिसत आहे. मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे.
दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.