हेसे (जर्मनी) : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला सुन्न करणारं वृत्त आहे. जर्मनीच्या हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली आहे. अर्थमंत्री शेफर यांचा मृतदेह फ्रॅन्कफर्टजवळच्या होकाईम इथे रेल्वे ट्रॅकवर सापडला. कोरोना व्हायरसमुळे जी आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे, अशात देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार, या विचाराने थॉमस शेफर तणावाखाली होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. जर्मनीमध्येही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात आतापर्यंत 540 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.


54 वर्षीय थॉमस शेफर हे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिस्तिन डेमोक्रॅटिक युनियनचे सदस्य होते. गेल्या दहा वर्षांपासून ते हेसे राज्याचे अर्थमंत्री होते. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविरोधात लढण्यासाठी दिवस-रात्र काम करीत होते. शिवाय विविध कंपनी व कामगारांना मदतही करीत होते. कोरोनामुळे पुढे काय होणार यामुळे ते चिंतेत होते. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास होत होता. त्यामधूनच थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं कळतं.


जगभरात कोरोनाबाधितांची संख्या साधारण सव्वा सात लाख आहे. तर मृतांची संख्या 34 हजारांच्या घरात आहे. यापैकी एक लाख 51 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर अजून जवळपास पाच लाख 37 हजार लोग कोरोनाग्रस्त आहे. त्यातील पाच टक्के म्हणजे साधारण 27 हजार गंभीर आहेत.


अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रुग्णांची संख्या एक लाख 42 हजार आहे. काल (29 मार्च) एका दिवशी रुग्णसंख्या 18 हजारांनी वाढली. अमेरिकेत काल 255 लोकांनी जीव गमावला, तिथे मृतांचा आकडा 2475 एवढा आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 60 हजार रुग्ण आहेत तिथे 965 जणांनी जीव गमावला आहे. त्या खालोखाल वॉशिंग्टनमध्ये 195, लुईझियाना 151, न्यूजर्सीत 161 , तर कॅलिफोर्निया 131 आणि मिशिगनमध्ये 132 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.


इटलीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच
काल दिवसभरात इटलीने तब्बल 756 माणसं गमावली. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 10 हजार 779, तले 6360 मृत्यू उत्तर इटलीतील लोम्बार्डी प्रांतात. म्हणजे चीनच्या दुप्पट लोक इटलीने या एका प्रांतात गमावली आहेत. काल रुग्णांची संख्या सव्वा पाच हजारांनी वाढली. इटलीत आता जवळपास 98 हजार रुग्ण आहेत.


स्पेनमध्येही हाहाकार
स्पेनने काल सहा हजार बळींचा टप्पा पार केला. तिथे मृतांचा आकडा 6803 वर पोहोचला. गेल्या 24 तासात तब्बल 821 मृत्यूमुखी पडले आहेत. रुग्णांच्या संख्येत सात हजारांची भर पडली, तिथे आता 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.


जगभरातील कोरोनाची स्थिती




  • इराणमध्ये बळींच्या संख्येत 123 ची भर, एकूण 2640 मृत्यू, रुग्णांची संख्या 38 हजार.

  • फ्रान्समध्ये 2606 बळी, काल तिथे 292 लोकांनी जीव गमावला, एकूण रुग्ण 40 हजारावर

  • जर्मनीत काल 108 ची भर पडली, तिथे आता कोरोनाचे 541 बळी

  • इंग्लंडने काल 209 लोक गमावले तिथला बळीचा आकडा पोहोचला 1228 वर

  • कोरोनाने हॉलंडमध्ये काल 132 बळी घेतले तिथे एकूण 771 लोक दगावले आहेत,

  • बेल्जियममध्ये काल 78 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 431वर.

  • स्वित्झर्लंडमध्ये 300, स्वीडनमध्ये 110, ब्राझील 136, पोर्तुगाल 119, इंडोनेशिया 114 तर टर्की 131 बळी गेले आहेत.

  • जपान आणि दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे.

  • दक्षिण कोरिया मृतांच्या आकड्यात काल 8 ने भर पडली आता मृतांचा आकडा आहे 152

  • तर जपानमध्ये 54 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

  • आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या दीड हजारावर पोहोचली आहे, तिथे 14 लोकांचा बळी घेतला आहे कोरोनाने

  • चीनमध्ये काल फक्त 45 नवे रुग्ण आढळले तर 5 लोक मृत्यूमुखी पडले.

  • चीनमध्ये मृतांचा आकडा 3300. तिथे 81,439 रुग्णांपैकी 75 हजार 448 बरे झाले आहेत, आता फक्त 2691रुग्ण आहेत, त्यातले फक्त 742 गंभीर आहेत

  • गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 59 हजारांची तर बळींच्या आकड्यात 3095 ची भर पडली