Xi Jinping Address China: कोरोनामध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीनं तीन वर्षांपासून जगाला टेन्शनमध्ये टाकलं आहे. 2022 च्या वर्षाअखेरीस पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनानं हाहा:कार माजवलाय. चीनमध्ये दररोज नऊ ते दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू होतोय. देशात धोका वाढला असतानाच 2022 वर्षाच्या अखेरच्या दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या जनतेला संबोधित केलेय. यावेळी बोलताना शी जिनपिंग म्हणाले की, 'चीनमध्ये करोनामुळे माणसांच्या सुरक्षेबाबत एक नवा आयाम मिळाला आहे. नव्या युगात प्रवेश करताना, आपण आपल्या सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.'
सध्या चीनमध्ये कोरोना महामारीचं संकट अधिक गडद झालं आहे. दररोज कोरोनाचे लाखो नवीन रुग्ण आढळत आहेत. तर हजारो नागरिकांचा मृत्यू होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता धोका पाहता इतर देश अलर्ट झाले आहेत. तसेच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. अशातच शनिवारी 31 डिसेंबर 2022 रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी टीव्हीवरुन जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले की, 'कोरोनाविरोधातील लढाईमध्ये चीनने अभूतपूर्व अडचणी आणि आव्हानांचा सामना यशस्वीपणे केलाय. ' चीनच्या कोरोना नीतीवर बोलताना जिनपिंग म्हणाले की, 'देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. आपण झिरो कोविड पॉलिसी संपवली. तीन वर्षांपासून चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी होती.'
फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक -
जनतेला संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, 'कोरोना महामारीमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर, ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक अडचणी असतानाही त्यांनी धैर्याने काम केलेय, यासाठी कौतुक करायला हवं. ' कोरोना महामारीला संपवण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी अद्याप खूप काम करण्याची गरज आहे. त्यासाठी चीनमधील जनता जिवाचं रान करत आहे. आपण सर्वजण कोरोनाच्या विरोधात लढा देऊयात, यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळेल, असे शी जिनपिंग म्हणाले.
चीनमध्ये दररोज 9000 हून अधिक जणांचा मृत्यू -
चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत, असा दावा ब्रिटनमधील (UK) संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या (Airfinity Firm) हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेनं केलाय. चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच कोविड संसर्ग वेगाने पसरू लागला होता. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात असलेल्या चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती फार गंभीर आहे. एअरफिनिटी फर्मच्या मते, चीनमधील सुमारे 9,000 लोक दररोज कोविड-19 मध्ये आपला जीव गमावत आहेत.