What is Covid ‘super variant’ XBB.1.5: चीननंतर अमेरिकेतही कोरोना महामारीनं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये ओमायक्रॉनचा XBB.1.5 हा सब व्हेरियंट आहे. या सब व्हेरियंटमुळे अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या (CDC) माहितीनुसार, अमेरिकेत आढळत असणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण XBB.1.5 या सब व्हेरियंटचे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, XBB.1.5 या सब व्हेरियंटचा रुग्ण भारतातही आढळला आहे. गुजरातमध्ये XBB.1.5 सब व्हेरियंटचा रुग्ण आढळळा आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शेजारच्या राज्यात ओमायक्रॉन XBB.1.5 सब व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासन सतर्क झालेय.
महाराष्ट्र सतर्क -
XBB.1.5 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचा रुग्ण गुजरातमध्ये आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झालेय. डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रशासन सतर्क झालं आहे. गुजरातमध्ये XBB.1.5 या सब व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशीची कोरोना चाचणी करण्यात येत असून 100% जीनोमिक सिक्वेन्सिंगही करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास दोन टक्के प्रवाशाचं थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येतेय.
महाराष्ट्रात XBB व्हेरियंटचे 275 रुग्ण आढळले आहेत. पण XBB.1.5 या सब व्हेरियंटने गुजरातमध्ये प्रवेश केलाय, हा सब व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत अधिक संक्रमक आहे. हा सब व्हेरियंटमध्ये आणि आधीच्या व्हेरियंटमध्ये किरकोळ बदल असल्याचं समोर आले आहे. तरीही, त्याचा राज्यात प्रसार रोखण्यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत आहोत, असे प्रदिप आवटे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना सांगितलं.
काय आहे XBB.1.5 सब-व्हेरियंट?
अमेरिकेतील विषाणूशास्त्रज्ञ अॅरिक फेगल डिंग म्हणाले की, XBB.1.5 सब- व्हेरियंटमुळे न्यूयॉर्कच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णामध्ये 40 टक्के रुग्ण ओमायक्रॉनच्या XBB.1.5 सब व्हेरियंटचे आहेत. हा सब व्हेरियंट अधिक वेगानं संक्रमित होतो. XBB.1.5 हा सब व्हेरियंट ओमायक्रॉनच्या आधीच्या दोन सब-व्हेरियंटच्या BQ.1 आणि XBB या तुलनेत अधिक संक्रमक आहे. तसेच हा सब व्हेरियंट इम्युनिटीला चकवा देतो. तसेच हा ओमायक्रॉनचा म्युटेट सब व्हेरियंट आहे. XBB च्या तुलनेत हा 96 टक्के अधिक वेगानं संक्रमित होतो. BQ.1 पेक्षा 120 टक्के अधिक संक्रमित होतो. अमेरिकेशिवाय हा सब व्हेरियंट युकेमध्येही वेगानं पसरत आहे.