बिजिंग : अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं उत्तर कोरियावरुन केलंलं ट्विट चीनला चांगलंच झोंबलं आहे. कारण, ट्रम्प यांच्या ट्विटवरुन चिनी मीडियानं ट्रम्प प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे. चिनी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'ने ट्रम्प प्रशासनाचे वाभाडे काढणारा लेख प्रकाशित केला असून, यात अमेरिकेनं उत्तर कोरियाशी व्यापार बंद करावा, आणि मग उपदेश द्यावेत, असं सांगितलं आहे.




जगातील सर्व देशांच्या विरोधानंतरही उत्तर कोरियानं नुकतीच अणूचाचणी घेतली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन, चीनच्या भूमिकेवर खंत व्यक्त केली. ''चीनने  आम्हाला निराश केलं आहे. अमेरिकेच्या मदतीमुळे चीनने व्यापाऱ्यात अब्जावधी डॉलर्स कमावलं. मात्र, आता चीनने आम्हाला पाठ दाखवली. उत्तर कोरियाच्या प्रकरणात चीनने बाता मारण्याशिवाय काहीच केलं नाही. ठरवलं असतं, तर चीन या समस्येवर तोडगा काढू शकलं असतं.'' असं ट्रम्प यांनी या ट्वीटमध्ये म्हणलं आहे.

ट्रम्प यांच्या याच ट्विटचा समाचार घेणारा लेख 'ग्लोबल टाईम्स'नं प्रकाशित केला आहे. या लेखात म्हणलंय की, ''ट्रम्प यांच्या ट्विटमुळे त्यांचा मूड काय आहे हे लक्षात येतं. आणि चीनबद्दल अशाप्रकारची टिप्पणी अमेरिकेचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षच देऊ शकतो. ज्याला चीननं उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची कल्पना नाही''

उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी चीननं राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती देताना 'ग्लोबल टाईम्स'नं म्हणलंय की, ''चीननं प्योंगयाँगमधील आण्विक आणि क्षेप्णास्त्र परिक्षणासंदर्भात उत्तर कोरियावर मोठा दबाव निर्माण केला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कलमाअंतर्गत चीनने उत्तर कोरियावर दबाव निर्माण करण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे, चीनने उत्तर कोरियावर कोळसा आयात करण्यासंदर्भात निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठी कटुता आली आहे. आपल्या शेजारीला देशांशी व्यापार करताना, चीनला सर्वात मोठी किंमत चुकवावी लागत आहे.''

ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवताना ग्लोबल टाईम्सनं म्हणलंय की, ''चीनने राबवलेल्या या कार्यक्रमांची अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाला कल्पना नाही. त्यामुळे अमेरिकेकडून कितीही धमक्या दिल्या तरी चीनवर याचा काहीही परिणाम होणार नाही.''

संबंधित बातम्या

युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश