India China Relations: भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताला जबाबदार धरले आहे. सिंगापूरमध्ये शांग्री-ला डायलॉग 2022 च्या पाचव्या सत्राला संबोधित करताना चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंग म्हणाले की, चीन आणि भारत हे शेजारी आहेत आणि त्यांच्यासाठी चांगले संबंध असणे गरजेचं आहे. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी रविवारी लडाखमधील दोन्ही देशांमधील लष्करी संघर्षाला भारताला जबाबदार धरत अनेक वक्तव्य केले आहेत.


चांगले संबंध निर्माण करण्यावर भर


गलवानमधील संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनचे संरक्षण मंत्री म्हणाले की, चांगले संबंध राखणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत. मात्र सीमाभागातील संघर्षावरून या प्रकरणाचे पैलू स्पष्ट होतात. संरक्षण मंत्री म्हणून संघर्षाची सुरुवात आणि शेवट मी वैयक्तिकरित्या अनुभवला. आम्हाला भारतातील बरीच शस्त्रे मिळाली आहेत. त्यांनी (भारताने) चिनी भागात लोकही पाठवले आहेत.


शांतता आणि विकास मानवतेचे ध्येय


जनरल फेंगे पुढे म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत आणि दोन्ही बाजू या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत. क्षेत्रीय व्यवस्थेबाबत चीनच्या दृष्टिकोनावर बोलताना जनरल फेंग म्हणाले की, आपला देश (चीन) अशा अनेक संकटांना तोंड देत आहे, जे इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात. ते म्हणाले की, पुढे जाण्याचा मार्ग, शांतता आणि विकास हे मानवतेचे समान ध्येय असले पाहिजे.


निर्बंध लादणे हा युद्ध थांबवण्याचा उपाय नाही


फेंगे म्हणाले की, आपल्या देशाला फक्त आणि फक्त शांतता हवी आहे. स्थिरता हवी आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्सला एकता मजबूत करण्याचे आणि विभाजन नीतीला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. जनरल फेंगे यांनी क्षेत्रीय सुरक्षा परिषदेत सांगितले की, युक्रेनमधील युद्धाचा जगावर परिणाम झाला आहे. जनरल फेंगे म्हणाले की, चीन युक्रेनमधील युद्धाला पाठिंबा देत नाही. त्याचबरोबर निर्बंध हा युद्ध थांबवण्याचा उपाय नसल्याच्या चीनच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. जनरल फेंगे म्हणाले की, चीन संवादाद्वारे युद्ध संपवण्यास समर्थन देतो आणि हा विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.