बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश जारी केला आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या सुमारे 9 कोटी सदस्यांना आदेश देण्यात आला आहे की, पक्षाची एकजूट कायम राहण्यासाठी धर्माचा त्याग करावा.

“कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी धर्मावर विश्वास ठेवायला नको आणि ज्यांना धर्मावर विश्वास आहे, त्यांनी लवकरात लवकर धर्माचा त्याग करावा.”, असा कम्युनिस्ट पार्टीकडून आदेश देण्यात आला आहे.

स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन फॉर रिलिजियस अफेअर्सचे संचालक वांग जुओआन यांनी शनिवारी कियुशी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलंय की, कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी धर्मावर विश्वास ठेवू नये आणि हा आदेश प्रत्येक सदस्यासाठी रेडलाईन आहे. पार्टीचा प्रत्येक सदस्य कट्टर मार्क्सवादी नास्तिक असायला हवा. त्यांनी पार्टीच्या नियमांचे पालन करायला हवे आणि पार्टीवर विश्वास ठेवायला हवा. पार्टी त्यांना धर्मावर विश्वास ठेवण्याची मुभा देत नाही.”

त्याचसोबत, याच लेखात असेही म्हटलंय की, “ज्या अधिकाऱ्यांना धर्मावर विश्वास आहे, त्यांनी धर्माचा त्याग करायला हवा. जे आदेशाला विरोध करतील, त्यांच्यावर संघटनेच्या वतीने शिक्षा केली जाईल.”

चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या या आदेशाची चीनसह जगभरात चर्चा होते आहे. त्यावरुन उलट-सुलट प्रतिक्रियाही सोशल मीडियात पाहायला मिळत आहेत.