चीनची चँग 4 मोहीम फत्ते, चंद्राच्या अंधाऱ्या भागावर उतरलं यान
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2019 11:31 PM (IST)
चीनच्या शिंगचँग सॅटलाईट लाँच सेंटरहून लुनार प्रोब हे यान 8 डिसेंबर 2018 या दिवशी चंद्राच्या दिशेने झेपावलं. अवघ्या 26 दिवसात ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या अंधाऱ्या बाजूवर उतरलं.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : चंद्राची पृथ्वीच्या दिशेने असणारी बाजूच जगाने आतापर्यंत पाहिली. मात्र चीन आता पृथ्वीसाठी कायम अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकणार आहे. सगळ्या बलाढ्य देशांना मागे टाकत चीनने चंद्राच्या अंधारावर ताबा मिळवला आहे. चीनचं 'चँग 4' अवकाश मोहिमेतलं यान गुरुवारी सकाळी चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलं आणि सगळ्या जगाच्या भुवया उंचावल्या. कारण या अंधाऱ्या भागात यान उतरवणं आतापर्यंत कुठल्याही देशाला शक्य झालेलं नाही. 8 डिसेंबर 2018 या दिवशी चीनच्या शिंगचँग सॅटलाईट लाँच सेंटरहून लुनार प्रोब हे यान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि अवघ्या 26 दिवसात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या अंधाऱ्या बाजूच्या तब्बल 2 हजार 500 किमीपर्यंत परसलेल्या विवरावर उतरलं. इथली परिस्थिती चंद्राच्या मध्यभागापेक्षा खूप वेगळी आहे. या परिस्थितीत जीवनाची पाळंमुळं रोवण्याचा चीन प्रयत्न करणार आहे. यानातून एक बॉक्स पाठवला असून त्यात बिया आणि अळ्या आहेत. त्याद्वारे जीवाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तीस वर्षांपूर्वी भारतासोबत चंद्राच्या दिशेने झेपावलेला चीन आता जगाच्या कितीतरी पुढे निघून गेला आहे. हे चँग अवकाश मोहिमांच्या यशावरुन कळतं. चँग 1 आणि चँग 2 या मोहिमांमध्ये चीनच्या यानांनी फक्त चंद्राला परिक्रमा घातल्या आणि त्याचा अभ्यास केला. चँग 3 मोहीमेत चीनचं यान चंद्राच्या पृथ्वीवरुन दिसणाऱ्या भागात उतरलं. चँग 4 या आत्ताच्या मोहिमेत चीनचं यान चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलं आहे पुढच्या वर्षीच्या चँग 5 या मोहिमेत चीनचं यान चंद्रावर जाऊन तिथली माती, खनिजं पृथ्वीवर घेऊन येणार आहे, तर 2030 पर्यंत चंद्रावर थेट माणूस पाठवण्याचा चीनचा मानस आहे. चीनची चँग 4 ही मोहीमही सोपी नव्हती. चीनच्या दुसऱ्या भागापर्यंत रेंज पोहचत नाही. त्यासाठी आधीच चीनने एक सॅटलाईट तिथे पाठवला आहे. आता हे यान सॅटलाईटला संदेश पाठवणार आणि सॅटलाईट पृथ्वीवर संदेश पाठवणार. चीनच्या या यानासोबत अत्याधुनिक रोबो आहे, जो तिथं खोदकाम करुन मातीचे नमुने गोळा करेल. याशिवाय एक पॅनारोमिक कॅमेराही आहे, ज्याद्वारे 360 अंशातले फोटो घेता येतील. एक मोजमाप करणारं यंत्र आहे, जे आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करेल. अमेरिका, रशिया यांनी त्यांच्या चांद्रयान मोहिमा कधीच थांबवल्या आणि अवकाशातल्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. भारतही यात मागे पडला. पण चीनसाठी चंद्रच अवकाश झाला आहे. जिथे जीवन रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि या चंद्रावरच्या त्यांच्या सततच्या मोहिमा हे शक्य करतील असंच चित्र आहे.