इस्लामाबाद : माणसांनी गजबजलेली ही इमारत पाहून कोणाला ही शाळा आहे, असं वाटेल. तर कोणाला ते वसतीगृह वाटेल. मात्र हा एका माणसाचा वंशवेल आहे. हम चार और हमारे 37 असं समीकरण असलेला हा इसम पाकिस्तानात पाहायला मिळेल.


हम दो, हमारे दो असा मुलांबाबतचा ट्रेंड असला तरी पाकिस्तानातलं एक कुटुंब याला अपवाद आहे. कारण त्यांचं हम 4 और हमारे 37 असं समीकरण आहे. हल्ली एकदोन लेकरांना सांभाळताना डोक्याचं भजं होतं,  पण इस्लामाबादच्या गुलजार खान यांचं आणि त्यांच्या तीन पत्नींचं मात्र बरंच वेगळं आहे.

गुलजार यांना ३ बायकांपासून आतापर्यंत ३ डझनपेक्षा जास्त मुलं आहेत. त्यांचा दीडशे जणांचा मोठा परिवार आहे. उत्तरी वझिरिस्तानमध्ये राहणाऱ्या गुलजार यांनी वयाची साठी गाठली आहे.

अल्लाह जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अन्न देतो, अशी गुलजार यांची भावना आहे. शिवाय क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या मुलांना दुसरी टीम लागणार नाही. इतकंच नाही, तर घरातल्या घरात तिरंगी मालिकाही आपण भरवू शकतो, असं ते मिश्किलपणे सांगतात.

ईश्वरानं मनुष्याची निर्मिती केली. त्यांचा जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया असताना ती रोखणारे आपण कोण? असा सवालही ते इतरांना विचारतात.

विशेष म्हणजे गुलजार यांचे बंधू मस्तान यांनाही तीन पत्नींपासून 22 मुलं आहेत. त्यामुळे मिया-बिवी राजी, बढने दो आबादी, असंच या चौघांचं सूत्र आहे.