अमेरिकेने पाकिस्तानाला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करण्याचा वारंवार समज देऊनही, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा आश्रित देश म्हणून झाली आहे.
अमेरिकेतील एका प्रतिनिधी सभेतही पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी एक प्रस्ताव नुकताच देण्यात आला होता. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही दहशतवादी कारवायांवरुन पाकिस्तानच्या नेतृत्वाला खडेबोल सुनावले होते.
विशेष म्हणजे, पाकिस्तानला सातत्यानं पाठिशी घालणाऱ्या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं. यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावं प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यातच आता फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पाकिस्तानचा टॉप 20 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पाकिस्तानचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा जगासमोर आलं आहे.

फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही पाकिस्ताननं देशांतर्गत असणाऱ्या अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. पाकिस्ताननं शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी पाठवून अस्थिरता पसरवण्यापेक्षा देशांतर्गत सुरक्षेचा विचार आधी करावा, असंही या अहवालातून पाकिस्तानला खडसावण्यात आलं आहे.