वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊन आता दीड वर्ष झाली आहे. परंतु  या व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अजूनही सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. याचदरम्यान या व्हायरसबाबत एक गुप्त अहवाल समोर आला आहे, ज्यामुळे जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे वळल्या आहे. कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्याच्या एक महिना आधी चीनच्या वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले होते, असं समोर आलं आहे.


अमेरिकेचं वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीचे तीन संशोधक नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडले होते आणि ते रुग्णालयात दाखल झाले होते. या वृत्तात वुहान लॅबमधील आजारी संशोधकांची संख्या, त्यांची आजारी पडण्याची वेळ आणि रुग्णालयाद दाखल होण्याची संपूर्ण माहिती आहे. 


या वृत्तामुळे वुहान लॅबमधून कोरोनाव्हायरस पसरल्याची शक्यता असल्याच्या दाव्याच्या तपासासाठी बळ मिळेल अशी आशा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या एक दिवस आधी हे वृत्त आलं आहे. या बैठकीत कोरोनाव्हायरसच्या उगमाबाबत पुढील टप्प्याच्या तपासावर चर्चा होण्याचा अंदाज आहे.


अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या या वृत्तावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण जो बाइडन प्रशासन 'कोरोनाव्हायरसच्या उगमाच्या तपासाबाबत गंभीर आहे, असं त्यांनी सांगितलं.


याआधी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम महामारीशी संबंधित तथ्यांचं कारण शोधण्यासाठी वुहानला गेली होती. परंतु वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाव्हायरस जगभरात पसरला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक तथ्ये नाहीत, असं डब्लूएचओने म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेला तपासात संपूर्ण सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवण्याचा आरोपही चीन झाला होता.


अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाव्हायरसचा उल्लेख 'चिनी व्हायरस' आणि 'वुहान व्हायरस' करत होते आणि चीनने यावर आक्षेप नोंदवला होता. 


याआधी मिळालेल्या माहितीनुसार, "चीनमध्ये मानवी पेशींवर या व्हायरसच्या प्रभावबाबत 2015 पासून प्रयोग सुरु होते. हे प्रयोग वुहानच्या वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये सुरु होते आणि यात बॅट लेडी नावाने प्रसिद्ध महिला संशोधक शी झेंग-ली यांचा समावेश होता. शी झेंग-ली या अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे मुख्य कोरोनाव्हायरस संशोधक राल्फ एस बॅरिक यांच्यासोबत काम करत होत्या."