नायजेरियातील बोको हराम (Boko Haram) या दहशतवादी संघटनेचा नेता अबुबकर शेकऊ (Abubakar Shekau) याने स्फोटकांनी स्वत: ला उडवून दिले. अबुबकर शेकऊ याने आत्महत्या केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. वस्तुतः वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की इस्लामिक स्टेटचा सामना करताना दहशतवादी संघटना बोको हरामचा नेता अबुबकर शेकऊ याने स्वत: ला उडवून दिले. वृत्तसंस्था एएनआयनेही वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत याला दुजोरा दिला आहे.
या अहवालात असे सांगितले गेले आहे की बुधवारी सांबिसा जंगलातील टिंबकटू येथील अबुबकर शेकऊच्या तळावर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. यावेळी या अतिरेक्यांच्या तावडीत सापडू नये म्हणून अबुबकर शेकऊ यांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले, त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बोको हराम या संघटनेने अबुबकर शेकऊ याच्या मृत्यूसंदर्भात जाहीरपणे कोणतीही माहिती दिली नाही.
नायजेरियन सैन्याकडून तपास सुरु
नायजेरियाचे लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद येरिमी यांनी म्हटले आहे की प्रशासन या प्रकरणाचा तपास करीत आहे. ते म्हणाले की यापूर्वीही अबुबकर शेकऊच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत, पण तो परत आला. त्यामुळे प्रशासन चौकशीनंतरच अधिकृत माहिती देईल.
2002 मध्ये बोको हरामची स्थापना
बोको हरामची स्थापना 2002 मध्ये झाली असून या संस्थेचा पाया मोहम्मद युसुफ याने घातला होता. नायजेरियाच्या स्थानिक भाषेत, बोको म्हणजे 'पाश्चात्य शिक्षणाला विरोध करणे'. पण 2013 मध्ये अमेरिकेने बोको हरामला दहशतवादी संघटना घोषित केले. नायजेरियात इस्लामचा प्रचार व शुध्दीकरण करण्यासाठी ही संघटना प्रथम तयार केली गेली होती, परंतु नंतर ती हिंसक संस्था बनली.