Cargo Boat Sinks In Indonesia: इंडोनेशियाच्या (Indonesia) दक्षिण सुलावेसी प्रांतातील मकासर येथील मालवाहू बोट बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या बोटीतील 25 लोक बेपत्ता असून बचाव पथके त्यांचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. प्रांतीय शोध, मदत आणि बचाव एजन्सीचे प्रमुख जुनैदी यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी मकासर येथील बंदरातून जात असताना खराब हवामानामुळे मालवाहू बोट बुडाली. त्यावर एकूण 42 जण होते. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, 17 लोकांना नंतर वाचवण्यात आले, त्यापैकी काहींना घटनेच्या वेळी समुद्रात असलेल्या दोन टगबोटींनी वाचवले. जुनैदी यांनी सांगितले की, शोध आणि बचाव एजन्सीला शनिवारी बुडालेल्या बोटीच्या ठिकाणाविषयी नवीन माहिती मिळाली आणि त्यांनी बचाव पथकांना त्या भागात पाठवले. इतर दोन बोटी आणि एक शोध आणि बचाव बोट, स्थानिक मासेमारी नौकांसह इंडोनेशियन हवाई दलाचे हेलिकॉप्टर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत. बुडालेली बोट ही प्रवासी बोट असल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते, परंतु जुनैदी यांनी नंतर स्पष्ट केले की, ही बांधकाम साहित्य वाहून नेणारी मालवाहू बोट होती. यात 36 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.


इंडोनेशियामध्ये असे अपघात सामान्य आहेत


17,000 पेक्षा जास्त लहान बेटांचा द्वीपसमूह असलेल्या इंडोनेशियामध्ये असे अपघात होणे  ही सामान्य घटना असल्याचे सांगण्यात येत आहे . वाहतुकीचे साधन म्हणून येथे अनेकदा बोटींचा वापर केला जातो आणि यादरम्यान सुरक्षेच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जाते. 2018 मध्ये उत्तर सुमात्रा प्रांतात बोट बुडाल्याने 167 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या बोटीत सुमारे 200 लोक होते. फेब्रुवारी 1999 मध्ये, इंडोनेशियामध्ये एक प्रवासी जहाज बुडाले, ज्यामध्ये 332 लोक होते. या अपघातातून केवळ 20 जण बचावले. हा अपघात देशातील सर्वात वेदनादायक अपघातांपैकी एक मानला जातो.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nepal Plane Missing : बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, बचाव पथक घटनास्थळी रवाना 
International Yoga Day : यंदाची 'आंतरराष्ट्रीय योग दिना'ची थीम काय? पंतप्रधानांनी केली घोषणा