रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी क्रांतिकारक बदल घडणार आहे. लवकरच महिलांना गाडी चालवण्याची मुभा मिळणार आहे. सौदीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना ड्रायव्हिंग करण्याचं स्वातंत्र्य बहाल होणार आहे.


महिला हक्क कार्यकर्त्यांच्या जोरदार मागणीनंतर पुढच्या उन्हाळ्यापासून महिलांना गाडी चालवण्यावर असलेली बंदी उठवण्यात येणार आहे. सौदी अरेबिया हा महिलांना वाहन चालवण्यापासून रोखणारा एकमेव देश होता. देशात ही बंदी धुडकावणाऱ्या महिला वाहनचालकांची धरपकड केली जात असे. त्यामुळे जगभरात सौदीची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.

सौदी अरेबियातील कडक कायद्यांमुळे महिलांना पुरुष नातेवाईकांच्या मक्तेदारीखाली राहावं लागतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हळूहळू महिलांना अनेक हक्क दिले जात आहेत. वाहन चालवण्याचं स्वातंत्र्य हा त्यापैकी एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

किंग सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय दिवसाच्या सोहळ्यात महिलांना रियाधमधील मुख्य स्टेडियममध्ये प्रवेश देऊन नवी सुरुवात केली होती.