मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं असलं तरी त्यांच्या लिबरल पक्षाला बहुमत मिळालं नाही. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 338 पैकी 170 या बहुमताच्या आकड्याचा पाठलाग करताना लिबरल पक्ष 156 जागांवर आघाडीवर आहे तर विरोधक कन्झर्व्हेटिव्ह पक्ष 121 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे लिबरल पक्षाला आता बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देण्यासाठी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या होत्या. यावेळी जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षासमोर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचं मोठं आव्हान होतं. कोरोना काळात केलेल्या कामासाठी लोक आपल्याला पूर्ण बहुमत देऊन स्वीकारतील अशी आशा जस्टिन ट्रुडो यांना होती. पण सध्याची परिस्थिती पाहता जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधान पदावर कायम राहतील पण त्यांना कोणताही महत्वाच्या निर्णय पारित करण्यासाठी इतर सहकारी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे हे स्पष्ट आहे.
गेल्या वेळच्या म्हणजे 2019 साली झालेल्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने 157 जागा जिंकलेल्या तर विरोधक कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 121 जागा जिंकल्या होत्या.
निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी उरला असताना जस्टिन ट्रुडो यांनी केवळ आपल्या महत्वाकांक्षेसाठी मध्यावधी निवडणुका लादल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. कोरोना विरोधातील लढाई मजबूत करण्यासाठी एका स्थिर सरकारची गरज असल्याचं मत व्यक्त करत जस्टिन ट्रुडो यांनी कन्झर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेत येण्यास लायक नाही असं म्हटलं होतं.
आता जस्टिन ट्रुडो जरी सत्तेत आले असले तरी त्यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा मिळवता आला नाही. त्यामुळे यापुढे राज्यकारभार करताना जस्टिन ट्रुडो यांना इतर लहान पक्षांवर अवलंबून रहावं लागेल हे स्पष्ट आहे.
संबंधित बातम्या :
- International Day of Peace : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांती दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- अंतराळवीरांच्या रक्तापासून मंगळावर बनणार घरं; रक्त, घाम आणि अश्रूपासून विशिष्ट पद्धतीच्या कॉंक्रिटची निर्मिती सुरु
- SpaceX Mission : इलॉन मस्क यांचे 'इन्स्पिरेशन 4' यशस्वी; सामान्य लोकांची पहिली अंतराळ सफर पूर्ण