विमानाने प्रवास करताना सामानाबाबत प्रत्येक एअरलाईन्सचे काटेकोर नियम असतात, याची माहिती विमान प्रवाशांना असेलच. जर विमान कंपनीने आखून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक वजनाचं सामान तुम्हाला न्यायचं असेल, तर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.
रेयान विल्यम्स हा प्रवासी आईसलंडहून इंग्लंडला घरी निघाला होता. त्याच्याकडे निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान असल्यामुळे ब्रिटीश एअरलाईन्सने त्याला अडवलं. अतिरिक्त सामानासाठी वेगळी बॅग घ्यावी लागेल आणि त्यांचे वेगळे पैसेही द्यावे लागतील, असं रेयानला सांगण्यात आलं.
रेयानकडे एक्स्ट्रा लगेजसाठी 125 डॉलर (अंदाजे 8 हजार रुपये) नव्हते. त्यामुळे जास्तीचे कपडे त्याने एकावर एक घालायचं ठरवलं. रेयानने तब्बल 10 टीशर्ट आणि 8 पँट्स एकाच वेळी घातल्या आणि फ्लाईटमध्ये शिरत होता.
आधी आपल्याला विमानात चढण्याची परवानगी दिली, मात्र नंतर ब्रिटीश एअरलाईन्सने मज्जाव केला, असा दावा रेयानने केला आहे. रेयानने गैरवर्तन केल्यामुळे त्याला बोर्डिंग पास न दिल्याचं स्थानिक मीडियाने म्हटलं आहे. रेयानने स्वतः या घटनेचा व्हिडिओ काढून शेअर केला आहे.
अखेर इझीजेटच्या विमानाने प्रवास करण्याचा प्रयत्न रेयानने केला. मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशा पडली. अखेर तिसऱ्या एअरलाईन्सची फ्लाईट पकडून रेयान रवाना झाला. मात्र त्याच्या लगेज आणि कपड्यांचं काय झालं, हे समजलेलं नाही.