लॉस अँजेलस : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. 19 वर्षीय ब्रिटीश व्यक्तीला लास वेगासमध्ये अटक करण्यात आली आहे.

 
ट्रम्प यांच्या लास वेगासमधील रॅलीमध्ये आरोपीने पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मिशेल सँडफोर्ड असं आरोपीचं नाव असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या उद्देशातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

 
ट्रम्प यांची हत्या करण्यासाठीच आपण कॅलिफोर्नियाहून लास वेगासला आल्याची कबुली त्याने सिक्रेट सर्व्हिस एजंटना दिली आहे. यापूर्वी कधीच बंदूक न चालवल्यामुळे आदल्या दिवशी शूटिंग रेंजवर त्याने सराव केल्याचीही माहिती आहे.

 
विशेष म्हणजे ट्रम्प यांचा जीव घेतल्यास तत्क्षणी पोलिस अधिकारी आपल्याला ठार करतील, यासाठी आपली तयारी झाल्याचंही त्याने सांगितलं. हा प्रयत्न फसल्यास पुढील रॅलीत हत्या करण्यासाठी त्याचीही तिकीटं त्याने विकत घेतली होती.