Britain Corona Update : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण वेगाने वाढत आहेत. ओमायक्रॉन संसर्गाच्या आकडेवारीत वाढ झाल्यामुळे रुग्णालयांवर मोठा भार पडत आहे. त्याच वेळी, देशातील राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) रूग्णालयांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयांमध्ये कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता भासत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची गंभीर कमतरता दूर करण्यासाठी लंडनच्या रुग्णालयांमध्ये सैन्य तैनात करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ब्रिटनमधील ओमायक्रॉनच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी लंडनच्या रुग्णालयांमध्ये सैन्य तैनात करण्यात येईल.
 
लंडनच्या रुग्णालयांमध्ये सैनिकांची तैनाती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 200 सशस्त्र दलाचे कर्मचारी लंडनमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून सामील होतील. रुग्णालयातील शेकडो कर्मचारी कोरोना विषाणूच्या विळख्यात आले असून, त्यामुळे रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. संरक्षण सचिव बेन वॉलेस म्हणाले की, ''सशस्त्र दलातील पुरुष आणि महिला पुन्हा एकदा राष्ट्रीय आरोग्य सेवेतील समर्पित सहकाऱ्यांना मदतीचा हात पुढे करत आहेत. यामुळे अधिक संक्रमित लोकांवर उपचार करता येतील.''


संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी सांगितले की, ''लष्कराच्या जवानांनी महामारीच्या काळात नेहमीच योगदान दिले आहे. रूग्णवाहिका चालवणे, लसीकरण करण्यापासून ते रूग्णालयातील रूग्णांची काळजी घेण्यापर्यंत सैनिकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.'' संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ''रुग्णालयात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांमध्ये 40 लष्करी डॉक्टर आणि 160 सामान्य कर्तव्य कर्मचारी असतील. ब्रिटनमध्ये मंगळवारी कोरोना संसर्गाच्या 2,18,724 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान, व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. अलीकडेच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सांगितले होते की, कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेमुळे रुग्णालयांची स्थिती चांगली नाही.



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha