Brazil President Election: दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश असणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदी (Brazil President Election) लूला डी सिल्वा (Lula da Silva) यांचा विजय झाला आहे. त्यांनी विद्यमान राष्ट्रपती जैर बोल्सनारो (jair bolsonaro) यांचा पराभव केला. सिल्वा यांच्या विजयामुळे ब्राझीलचे सत्ताकेंद्र पुन्हा एकदा डाव्या बाजूने झुकले आहे. ब्राझीलच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सिल्वा यांना 50.8 टक्के मते मिळाली. तर बोल्सनारो यांना 49.2 टक्के मिळाली. या पराभवामुळे मागील 30 वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी निवडून येणारे बोल्सानारो हे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशांमध्ये आता डाव्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दारात पुन्हा एकदा डाव्या विचारांचे वादळ घोंगावू लागले असल्याचे म्हटले जात आहे. 


राष्ट्रपतीपदी विजयी झालेले लुला डी सिल्वा यांनी निकालानंतर म्हटले की, आज ब्राझीलची जनता विजयी झाली आहे. हा विजय मला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचादेखील नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. लोकशाहीसाठी पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक घटकाचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. 


बोल्सनारो हे मतमोजणीच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात आघाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लूला डी सिल्वा विजयी झाले. लूला यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर साओ  पाउलोमध्ये कार चालकांनी हॉर्न वाजवून विजयाचा आनंद व्यक्त केला. तर, अनेक ठिकाणी विजयाचा जल्लोष दिसून आला.


ब्राझीलमध्ये झालेली ही निवडणूक 1985 नंतरची सर्वात ध्रुवीकरण झालेली ही निवडणूक होती, असे म्हटले जाते. लष्करी हुकूमशाहीनंतर कामगार नेते असलेले लूला डी सिल्वा यांनी बोल्सनारोविरोधात प्रचाराची राळ उठवली. बोल्सनारो हे माजी लष्करी अधिकारी आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कार्यकाळाची तुलना लष्करी हुकुमशाहीसोबत केली. बोल्सनारो यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू आणि बाधित आढळलेले असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला होता. त्याशिवाय, आदिवासी घटकांबाबतही त्यांनी अन्यायकारक निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. 


लूला डी सिल्वा हे 2003 ते 2010  या कालावधीत ब्राझीलचे राष्ट्रपती होते. या दरम्यान त्यांनी समाजवादी आर्थिक धोरण पुढे नेले होते. लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्ये ही त्यावेळी अमेरिकेविरोधात वातावरण निर्माण झाले होते. लूला यांनी यंदाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी ब्राझीलमधील सर्व घटकांच्या विकासाचे आश्वासन दिले.  सिल्वा यांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांना सहभागी होता आले नाही. त्यानंतर 2019 मध्ये त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली होती. डी सिल्वा यांच्या विरोधात चालवण्यात आलेला खटला चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्याचे कारण देण्यात आले होते. लूला डी सिल्वा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सहाव्यांदा राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली. 1989 मध्ये पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. लूला यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कामगार नेते म्हणून केली होती. लूला हे ब्राझीलच्या ग्रामीण भागात चांगलेच लोकप्रिय आहेत.