NASA Shares Sun Smiling : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ( NASA ) सूर्याचा ( Sun ) आतापर्यंतचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला सूर्याचा क्यूट फोटो असंही म्हटलं जात आहे. नासाच्या सॅटेलाईटने गेल्या आठवड्यात हसऱ्या सूर्याचा फोटो काढला आहे. या फोटोला 'स्मायलिंग सन' ( Smiling Sun ) असंही म्हटलं जात आहे. या फोटोला वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात आलं आहे. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या या फोटामध्ये एक हसरा चेहरा दिसत आहे. त्यामुळे अनेकांना हा फोटो हसरा सूर्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी या फोटोला रे ऑफ जॉय ( Ray Of Joy) म्हणजे आनंदाचा किरण असंही म्हटलं आहे. तर काहींनी या फोटोतील सूर्याचा उल्लेख 'भितीदायक सूर्य' ( Creepy Sun ) असाही केला आहे.


नासाच्या सौरवेधशाळेने  गेल्या आठवड्यात सूर्याचा एक फोटो काढला. या फोटोमध्ये सूर्य हसत असल्याचा भास होत आहे. फोटो निरखून पाहिल्यास तुम्हाला सूर्याच्या हसऱ्या चेहऱ्याची झलक पाहायला मिळत आहे. नासाने बुधवारी ट्विटरवर सूर्याचा फोटो शेअर केला आहे. ट्विटमध्ये नासाने लिहिलं आहे की, से चीज... आज नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने हसणाऱ्या सूर्याचा फोटो काढला आहे. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणारे, सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात आणि या क्षेत्रात वेगवान सौर वारे वाहतात.






नासाची सोलर डायनॅमिक्स वेधशाळा काय आहे?


नासाची ( NASA ) सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरीने (Solar Dynamics Observatory) हे नासाचं मिशन आहे, ज्यामध्ये सूर्याबाबतच्या रहस्यांवर संशोधन सुरु आहे. सूर्यावर सौर क्रिया कशी चालते आणि संपूर्ण विश्वात हवामान प्रक्रिया कशी चालते यावरही अधिक संशोधन करण्यात येत आहे. नासाकडून हे मिशन 11 फेब्रुवारी 2010 रोजी लाँच करण्यात आलं. वेधशाळेचे अंतराळयान सूर्याचे आतील भाग, सूर्यावरील वातावरण, चुंबकीय क्षेत्र आणि ऊर्जा याबाबत अधिक अभ्यास करत आहे.


तज्ज्ञ काय म्हणाले?


दरम्यान, सूर्याचा हा हसरा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी या फोटोला क्यूट फोटो म्हटलं आहे. मात्र तज्ज्ञांनी याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, सूर्यावर दिसणारे हे काळे डाग पृथ्वीकडे जास्त उष्णता पाठवत आहेत, हे हानिकारक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.