Bride Gave Birth on Wedding Day : एका जोडप्याने थाटामाटात लग्न करण्याचं नियोजन केलं होतं. या खास दिवसासाठी त्यांनी खास ठिकाणही बुक केलं होतं. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, लग्नाच्या दिवशीच नववधूने बाळाला जन्म दिल्याने या जोडप्याच्या लग्नाचं नियोजन पूर्णच कोलमडलं. लग्नाच्या एक दिवस आधी अचानक नववधूला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिने सुदृढ आणि गोंडस बाळाला जन्म दिला. अचानक बाळाच्या जन्मामुळे हे जोडपंही आश्चर्यचकित झालं. यामुळे आलिशान लोकेशनवर थाटामाटात लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन फसला.
ही घटना नेदरलँड्समधील (Netherlands) डोड्रेच शहरात घडली आहे. नववधू आधीच गरोदर होती. डॉक्टरांनी दिलेल्या प्रसूती तारखेच्या आधारावर निकोल आणि मार्क यांनी लग्नाची तारीख ठरवली. त्यामुळे निकोल आणि मार्क यांना वाटलं की, लग्नानंतरच बाळाची प्रसूती होईल. या जोडप्याने प्रसूतीच्या तारखेच्या खूप आधी लग्नाची तारीख ठरवली. त्यानुसार, सर्व तयारीही पूर्ण झाली. पण या नववधूची प्रसूती ठरलेल्या तारखेच्या पाच आठवडे आधीच झाली. यामुळेच हे जोडपंही आश्चर्यचकित झालं. प्रसूतीपूर्वी लग्न करण्याची जोडप्याच्या योजना अयशस्वी झाली.
लग्नाच्या दिवशीच नववधूने दिला बाळाला जन्म
लग्नाच्या दिवशीच म्हणजे 26 ऑक्टोबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास महिलेची प्रसूती झाली. यामुळे जोडप्याला त्यांचं लग्न थाटामाटात करण्याचा प्लॅन बदलावा लागला. पण या दोघांनीही ठरलेल्या दिवशीच लग्न करायचं ठरवलं होतं. त्यामुळे या जोडप्याने हॉस्पिटलमधेच लग्नगाठ बांधली. बाळाच्या प्रसूतीनंतर शहरातील अल्बर्ट श्वेत्झर हॉस्पिटलमध्येच हे जोडपं लग्नाच्या बेडीत अडकलं.
हॉस्पिटलच्या प्रार्थना कक्षात लग्न
दोघांच्या लग्नाचे विधी हॉस्पिटलच्या प्रार्थना कक्षात पार पडले. दोघांनीही लग्नासाठी बोलावलेले पाहुणेही लग्नाच्या आधीच ठरलेल्या ठिकाणाऐवजी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. एवढेच नव्हे तर सिव्हिल रजिस्ट्री अधिकाऱ्यालाही हॉस्पिटलमध्येच बोलावण्यात आलं. यावेळी विवाह नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने जोडप्याला सांगितलं की, तुम्ही दोघेही तुमच्या लग्नाची तारीख आयुष्यभर विसरणार नाही. आतापासून दरवर्षी हा दिवस तुमच्यासाठी दुहेरी आनंदाचा (Double Celebration) असेल.
श्वेत्झर हॉस्पिटलने एक निवेदन जारी करत म्हटलं की, वधू आणि वर निकोल आणि मार्क यांना वाटलं की, त्यांच्या मुलीच्या जन्माच्या खूप आधी त्यांचं लग्न होईल आणि त्यानंतर बाळाचा जन्म होईल. पण बाळाने वेगळी योजना आखली होती. 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजता बाळाचा जन्म झाला. विशेष म्हणजे आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत.