लंडन : ब्रिटनच्या मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. पॉप सिंगर गायिका अरियाना ग्रांडे यांच्या कॉन्सर्टवेळी हा हल्ला झाला.


मॅन्चेस्टर एरिना सभागृहात एक कॉन्सर्ट सुरु होतं. या कॉन्सर्टमधील गायिका अरियाना ग्रांडेचं शेवटचं गाणं सुरु असताना हे स्फोट झाले. यात 20 जणांचा मृत्यू झाला. तर स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर लोकं सैरावैरा पळायला लागले. त्यातही अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

या घटनेनंतर ग्रॅण्ड मॅन्चेस्टर पोलिसांनी लोकांना परिसरातून सुरक्षितस्थळी नेलं आहे. तसेच मॅचेन्सटरचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. तसंच अरियाना ग्रांडेलाही सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.


काय आहे मॅन्चेस्टर एरिना?

मॅन्चेस्टर एरिना हे इंग्लंडमधील सर्वात मोठं सभागृह आहे. याला ब्रिटिश एरिना असंही म्हणलं जातं. या सभागृहाची आसन क्षमता 21 हजार असून, 2002 मधील कॉमनवेल्थ खेळात या सभागृहाचा वापर करण्यात आला होता.

विशेष म्हणजे याच सभागृहात बॉक्सिंग आणि WWE चेही सामने भरवले जातात. ते पाहण्यासाठी अनेकजण प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते.