कराची : पाकिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. कराचीतील खैबर पख्तूनख्वातील हंगू हे शहर स्फोटानं हादरलं आहे. या स्फोटात 25 लोकांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी आहेत. हांगू येथील लोअर ओरकझाई येथील बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटानंतर या परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आहे. स्फोट कसा झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.


स्थानिक न्यूज चॅनेल जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, एका धार्मिक स्थळाच्या बाहेर स्फोट झाला आहे. यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक लोक जखमी आहेत.  जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षा दलांनी परिसर खाली केला असून सध्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी कराचीतील चीनच्या दूतावासासमोर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यामागे बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. एका दिवसात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरले आहे.