लंडन : भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे. लंडनमधील आलिशान घर वाचवण्यासाठी विजय मल्ल्याची स्विस बँक यूबीएसविरोधात कायदेशीर लढाई सुरु आहे. बुधवारी यूबीएस बँकेविरोधात विजय मल्ल्याच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद यूके उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे लवकरच घराची विक्री होण्याची शक्यता आहे.

कर्जाची परतफेड न केल्याने यूबीएस बँकेने घराच्या जप्तीची कारवाई सुरु केली होती. मात्र या कारवाईला विजय मल्ल्याने विरोध केल्याने, यूबीएस बँकने कर्जाची परतफेड आणि घराच्या जप्तीसाठी यूके उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंबंधी मल्ल्याने आपला युक्तिवाद मांडला होता. मात्र उच्च न्यायालयाने मल्ल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यामुळे त्याच्या लंडनमधील कॉर्नवॉल टेरेसस्थित घरावर लवकरच जप्ती येण्याची शक्यता आहे.

रोज कॅपिटल वेंचर्सने स्विस बँक यूबीएसकडून 195 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. रोज कॅपिटल वेंचर्स हे मल्ल्याचे मालकीचे आहे. त्यासाठी त्याने आपले लंडनमधील आलिशान घर तारण म्हणून ठेवले होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्यामुळे यूबीसी बँकेने जून 2016 साली कर्जाची प्रक्रिया बंद करत, घराच्या जप्तीची कारवाई सुरु केली होती.

रोज कॅपिटल वेंचर्स लिमिटेडचे शेअर्स सिलेता ट्रस्टकडे आहे. सिलेता ट्रस्ट विजय मल्ल्या, त्याची आई ललिता मल्ल्या आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याच्या मालकीचे आहे. सिलेता ट्रस्टवर 1 सप्टेंबर 2017 पर्यंत स्विस बँक यूबीएसचे 198 कोटी कर्ज आहे.