Bangladesh Boat Sinks : बांगलादेशमध्ये नदीत बोट पलटून मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. बांगलादेशात रविवारी पंचगड जिल्ह्यात ओव्हरलोड बोट उलटून 20 जणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील अनेक नागरिकही बेपत्ता आहेत. रविवारी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरू होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर पंचगडचे जिल्हा प्रशासक झहरुल इस्लाम यांनी सांगितलं की, या अपघातामध्ये झालेल्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.


अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता


इस्लाम यांनी सांगितलं की बेपत्ता लोकांची नेमकी संख्या माहित नाही, परंतु प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार बोटीत 70 हून अधिक लोक होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.






बांगलादेशात बोट पलटून अनेक अपघात


बांगलादेश गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खालच्या मार्गावर स्थित आहे. बांगलादेश 230 नद्यांनी वेढलेला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मालवाहू जहाजावर प्रवासी फेरी आदळून आणि बुडाल्याने झालेल्या अपघातात सुमारे 37 जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये, देशाच्या दक्षिणेकडील भोला बेटाजवळ ओव्हरलोड ट्रिपल डेकर बोट उलटल्याने किमान 85 लोक बुडाले.


त्यानंतर एका आठवड्यानंतर, आणखी एक बोट बुडाली आणि 46 लोकांचा मृत्यू झाला. या वर्षात आतापर्यंत बांगलादेशात अनेक छोट्या बोटींच्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नौदलाच्या अधिकार्‍यांनी माहिती देत सांगितलं की, बांगलादेशातील लाखो लहान आणि मध्यम आकाराच्या बोटींपैकी 95 टक्क्यांहून अधिक बोटींमध्ये सुरक्षा व्यवस्थेची कमतरता असते. या बोटी किमान सुरक्षा नियमांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे  बांगलादेशात अनेक छोट्या-मोठ्या बोट दुर्घटना घडतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या