Kamala Haris : अमेरिकेचे (America Election 2024) माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Haris) यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला. या दोघांनी शुक्रवारी फोनवरून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. बराक ओबामा यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस ओबामा दाम्पत्याचा पाठिंबा मिळाल्यावर आनंद व्यक्त करत आहेत.
बराक ओबामा यांनी आतापर्यंत अंतर राखले होते
बायडेन यांनी निवडणुकीनंतर माघार घेतल्यानंतर लगेचच त्यांनी कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होण्यासाठी पाठिंबा दिला होता. तेव्हापासून अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आतापर्यंत अंतर राखले होते, पण आता त्यांनीही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. कमला हॅरिस यांना आधीच डेमोक्रॅटिक उमेदवार होण्यासाठी आवश्यक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष पुढील महिन्यात 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अधिवेशन बोलवत आहे, ज्यामध्ये कमला हॅरिस यांना औपचारिक उमेदवार बनवण्यासाठी मतदान केले जाईल.
ओबामा म्हणाले, विजय निश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू
बराक ओबामा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये बराक आणि मिशेल दोघेही उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना फोन करून त्यांना पाठिंबा देत आहेत. बराक ओबामा यांनी कमला हॅरिसला सांगितले की, मिशेल आणि मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि तुम्हाला ही निवडणूक जिंकून व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. प्रतिसादात कमला हॅरिस यांनी ओबामा दाम्पत्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या अनेक दशकांच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कमला हॅरिस फोनवर म्हणाल्या की, तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
बिडेन बोलत असताना अनेक वेळा अडखळले
27 जून रोजी बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या अध्यक्षीय चर्चेपासून त्यांच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची उलटी गिनती सुरू झाली होती. त्या चर्चेदरम्यान, बायडेन बोलत असताना अनेक वेळा अडखळले होते. या काळात असे अनेक प्रसंग आले की, ते काय बोलत आहेत हे त्यांनाच कळत नव्हते. यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक नेत्यांनी बायडेन यांना अध्यक्षपदाची उमेदवारी सोडण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी त्यांच्या रॅलीमध्ये त्यांच्या आरोग्याचा आणि वयाचा मुद्दा जोरात मांडला. ज्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा, माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी आणि वजनदार डेमोक्रॅट्सनी त्यांच्यावर शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती.
सुरुवातीला नकार दिल्यानंतर, बायडेन यांनी 22 जुलै रोजी अचानक अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला.
कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड
देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे बायडेन म्हणाले. बिडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले. गेल्या महिन्यात 27 जून रोजी अमेरिकेत झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत जो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
इतर महत्वाच्या बातम्या