शेख हसीना चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2018 11:11 AM (IST)
300 पैकी 298 जागांचे निकाल हाती आले असून अवामी लीगने 287 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी आघाडी नॅशनल युनिटी फ्रंटला अवघ्या 6 जागांवरच विजय मिळाला आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे.
ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना चौथ्यांदा विराजमान होणार आहेत. मतदानादरम्यान देशभरात झालेल्या हिंसाचारात 17 जण ठार झाले होते. बांगलादेश संसदेच्या 300 जागांपैकी 299 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 1,848 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीस हिंसाचाराचे गालबोट लागलं होतं. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने 298 पैकी 287 जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. 300 पैकी 298 जागांचे निकाल हाती आले असून अवामी लीगने 287 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी आघाडी नॅशनल युनिटी फ्रंटला अवघ्या 6 जागांवरच विजय मिळाला आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथे निवडणूक झाली नव्हती. हसीना यांना दक्षिण पश्चिम गोपालगंज मतदारसंघात 2,29,539 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला अवघे 123 मते मिळाली, अशी माहिती बांगलादेश निवडणूक आयोगाने दिली आहे. बांगलादेशमधील विरोधी पक्ष एनयूएफ आघाडीने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. काळजीवाहू तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.