ढाका : बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसा, जाळपोळ आणि अराजकतेदरम्यान हिंदू युवक दीपू चंद्र दास (Dipu Das) याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली (Blasphemy Violence) जमावाने दीपू दास याला मारहाण करून ठार केलं आणि नंतर मृतदेह जाळल्याची घटना घडली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेनंतर बांग्लादेशातील अल्पसंख्याक समूदायात संतापाची लाट उसळली असून, भारतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Who was Dipu Das : दीपू दास कोण होता?
25 वर्षीय दीपू चंद्र दास हा बांग्लादेशातील मैमनसिंह शहरात वास्तव्यास होता. तो अल्पसंख्याक हिंदू समुदायातून येत होता आणि अत्यंत गरीब कुटुंबातील होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो स्क्वेअर मास्टरबारी परिसरातील ‘पायनियर निट कम्पोझिट’ या वस्त्रोद्योग कारखान्यात काम करत होता. दीपू हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता.
Bangladesh Blasphemy Violence : ईशनिंदेचा आरोप आणि जमावाचा हल्ला
गुरुवारी कारखान्याच्या परिसरात आणि आसपास मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. याचवेळी ईशनिंदेचा आरोप करत जमावाने दीपू दासवर अचानक हल्ला केला. त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यातच दीपू दासचा जागीच मृत्यू झाला.
Bangladesh Violence : मृतदेहाला आग लावून अमानुष कृत्य
भालुका मॉडेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल मालेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर जमावाने दीपू दासचा मृतदेह ढाका–मैमनसिंह महामार्गावर टाकून त्याला आग लावली. दीपू दासचे वडील रविलाल दास यांनी सांगितले की, त्यांना आपल्या मुलाच्या हत्येबद्दलची माहिती सोशल मीडियावरून मिळाली.
“माझ्या मुलाला आधी बेदम मारहाण करण्यात आली, नंतर झाडाला बांधले आणि त्याच्यावर रॉकेल ओतून आग लावण्यात आली. त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह रस्त्यावर टाकून दिला होता. हे दृश्य आमच्यासाठी असह्य आहे,” अशी वेदनादायी प्रतिक्रिया रविलाल दास यांनी दिली.
Dipu Das Murder : प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक
दीपू दास मॉब लिंचिंग प्रकरणात रॅपिड अॅक्शन बटालियनने (RAB) आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. बांग्लादेश सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. बांग्लादेशच्या युनूस सरकारने या हत्येचा तीव्र निषेध करत, नव्या बांग्लादेशमध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही असे स्पष्ट केलं. मात्र, दीपू दासच्या वडिलांनी सरकारकडून अद्याप कोणतेही थेट आश्वासन न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.
Bangladesh News : मानवाधिकार कार्यकर्त्यांचा संताप
निर्वासित बांग्लादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनी दीपू दासच्या हत्येवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, दीपू यांच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप लावण्यात आला होता. एका क्षुल्लक वादातून एका सहकाऱ्याने त्यांच्यावर आरोप केल्याने जमाव हिंसक झाला आणि त्यात दीपूचा बळी गेला.
“दीपू दास हा गरीब मजूर होता. तो आपल्या अपंग वडील, आई, पत्नी आणि मुलाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची हत्या म्हणजे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होणे आहे,” असे तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं.
भारतामधूनही तीव्र प्रतिक्रिया
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेला मानवतेविरोधातील गुन्हा आणि सभ्य समाजावरचा डाग असे संबोधले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा: