नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी जेटलींना दोन आठवड्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
66 वर्षीय अरुण जेटली 13 जानेवारीला अमेरिकेला गेले होते. त्यांना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर झाल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान जेटली सोशल मीडियावर सक्रिय होते. फेसबुकवर पोस्ट लिहिण्यासोबतच त्यांनी चालू घडामोडींवर ट्वीटही केले होते. जेटलींच्या अनुपस्थितीत रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल अर्थ विभागाचं काम पाहतील. 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पही तेच सादर करतील.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. निवडणुकीमुळे हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.
याआधी 14 मे 2018 रोजी अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्सवर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळीही पियुष गोयल यांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. तीन महिने कामकाजापासून दूर राहिल्यानंतर जेटलींनी 23 ऑगस्टला पुन्हा एकदा अर्थमंत्रीपदी रुजू झाले होते.
संबंधित बातम्या
जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार
अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान, अमेरिकेला गेल्याने अर्थसंकल्पाला मुकणार?