मुंबई : ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीगचे नेते त्याच्या घरी येऊन त्याची भेट घेऊन गेले. मरकजी मुस्लिम लीग ही लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी आहे. या संघटनेच्या युवा आघाडीचा अध्यक्ष हॅरिस दार हा नदीमच्या घरी आला होता. या दारवर लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचा आरोप आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकून देखील सध्या नदीम हा आता वादात अडकण्याची शक्यता आहे.


पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचा प्रवक्ता तबिश कय्युम आणि युवा विंगचा अध्यक्ष हॅरिस दार यांनी अर्शद नदीमची त्याच्या घरी भेट घेतली. पीएमएमएलने (PMML) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून ही माहिती दिली. त्याचवेळी लष्करने आपल्या एक्स हँडलवर या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने अर्शद नदीम आणि त्याच्या वडिलांना निवडणुकीचे तिकीट देण्याची घोषणा केली. या भेटीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून अर्शद नदीम हा मोहम्मद हॅरिस दारसोबत बोलताना दिसतोय.


 




लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी फंड गोळा करणाऱ्या लोकांसोबत भेट घेतल्यानंतर आता अर्शद नदीम वादात सापडण्याची शक्यता आहे. 


हाफिज सईदने केली होती PMMLची स्थापना


PMML ची स्थापना हाफिज सईदने 2017 मध्ये केली होती. त्यात म्हटले होते की पीएमएमएल 2018 च्या निवडणुका लढवेल. परंतु अमेरिकेच्या निर्बंधांनंतर राजकीय पक्ष म्हणून त्याची नोंदणी झाली नाही.


नदीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले


अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. या 27 वर्षीय खेळाडूने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर अंतर कापले आणि सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत नदीमने 90 मीटरचा टप्पा दोनदा ओलांडला. ऑलिम्पिक इतिहासात ही कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राने त्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.


ही बातमी वाचा: