वॉशिंग्टन: दहशतवादाला प्रोत्साहन देण्याबद्दल पाकिस्तानकडून दंड वसूल करावा, असा सल्ला अमेरिकतल्या थिंक टँकने डोनाल्ड ट्रम्प सरकारला दिला आहे. या थिंक टँकने 'रिपोर्ट ऑफ द एक्सपर्टस् वर्किंग ग्रुप ऑन पाकिस्तान पॉलिसी' या नावाने एक आहवाल ट्रम्प प्रशासनाला दिला असून, या थिंक टँकमध्ये अमेरिकेतील मान्यवर विचारवंतांनी आपली मतं मांडली आहेत.
या थिंक टँकच्या समूहाने, जर पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तानविरोधातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे बंद केलं नाही, तर अमेरिकेने त्यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे, या समूहाने पाकिस्तानला 'दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र' म्हणून घोषित केलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
शिवाय, पाकिस्तानच्या सैन्य दलातील आणि गुप्तहेर संघटनांमधील अधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी, असंही त्यांनी सुचवलं आहे. तसेच काश्मीरप्रश्नी अमेरिकेने या प्रकरणात मध्यस्थी करु नये, असंही सांगितलं आहे. या विशेषज्ञांनी दिलेल्या आहवालात भारत-पाक संबंधात तणाव निर्माण होण्यास इस्लामाबादला दोषी ठरवलं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीमबहुल सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे. या यादीत पाकिस्तानचा समावेश नसला, तरी ट्रम्प सरकारमधील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने यापूर्वीच या यादीत पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील विचारवंतांनी दिलेला हा रिपोर्ट पाकिस्तान आणि अमेरिकेती बघडलेलं संबंध अधोरेखित केले आहे.