भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला अमेरिकेचं समर्थन, पाकिस्तानला चपराक
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 03:28 PM (IST)
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचं अमेरिकेने समर्थन केलं आहे. भारताला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने उरी हल्ल्याला सीमेपलिकडचा दहशतवाद म्हटलं आहे. पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. यापूर्वी रशियानेही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. त्यातच आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन करत असल्याचं भारतानं वारंवार दाखवून दिलं आहे. पाकिस्तानी मीडियानेही दहशतवादाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. डॉन वृत्तपत्राच्या पत्रकाराला पाकिस्तानबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यानंतर द नेशन या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमधून पाकिस्तान सरकारवर टीकाही केली आहे.