न्यूयॉर्क : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  हाफिज सईदला अटक करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दहा वर्ष शोधल्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या तथाकथित मास्टरमाइंडला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला शोधण्यासाठी मागील दोन वर्षात प्रचंड दबाब टाकण्यात आला होता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


आज हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. हाफिज सईदची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. लाहोरहून गुजरनवाला इथे जाताना हाफिज सईदला अटक करण्यात आली. पाकिस्तानात दहशतवादाविरोधात काम करणारी सरकारी संस्था काऊंटर टेरोरिझम डिपार्टमेंट अर्थात सीटीडीने हाफिज सईदला लाहोरमध्ये बेड्या ठोकल्या.

सीटीडीने 3 जुलै रोजी हाफिज सईदसह जमात उद दावाच्या 13 नेत्यांविरोधात 23 गुन्ह्यांची नोंद केली होती. पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादासाठी आर्थिक सहाय्य   पुरवल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवले होते.

दरम्यान, पाकिस्तानच्या कारवाईवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण पाकिस्तानने याआधीही हाफिज सईदवर कारवाई केल्याचं नाटक केलं आहे. पण त्याच्याविरोधात ठोस पाऊलं उचललेली नाहीत.

दुसरीकडे, ऑक्टोबरपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा गर्भित इशारा फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात FATF ने दिला होता. त्यामुळे पाकिस्तानातील डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारने हाफिज सईदवर कारवाई केल्याची चर्चा आहे.

ब्लॅक लिस्टपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचा डाव
आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला पाकिस्तान कोणत्याही प्रकारची बंदी झेलण्याच्या परिस्थिती नाही. त्यामुळे स्वत:च पोसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाईचा दिखावा करण्याशिवाय पाकिस्ताकडे पर्याय नाही. संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. तर अमेरिकेनेही त्याच्यावर भलीमोठी रक्कम जाहीर केलं आहे.

हा पाकिस्तानचा दिखावा : उज्ज्वल निकम
मुंबई हल्ल्याच्या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही पाकिस्तानची कारवाई फक्त दिखावा असल्याचं सांगितलं आहे. आम्ही मुंबई हल्ल्यासंदर्भातील पुरावे पाकिस्तानला सोपवले होते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबावामुळे जगाला धोका देत आहे. आता पाकिस्तान हाफिज सईदविरोधात किती पुरावे सादर करतं आणि त्याला किती शिक्षा ते, हे पाहावं लागेल. नाहीतर मी याला फक्त एक ड्रामाच म्हणेन, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

कोण आहे हाफिज सईद?

- हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. तसंच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह-संस्थापकही आहे.

- भारतातील अनेक दहशतवाई हल्ले या दोन संघटनांनी केले आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

- अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.

- अमेरिकेने हाफिज सईदवर एक कोटी डॉलरचं इनामही जाहीर केलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.