हेग (नेदरलॅण्ड्स) :   भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. 15-1 मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.


हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील आंतरराष्ट्रीय कोर्टात आज निर्णय देण्यात आला. या निर्णयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, कुलभूषणना कायदेशीर मदत देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. कुलभूषण यांच्यावर पुन्हा खटला चालणार आहे. मात्र आता त्यांच्याकडे कायदेशीर बचावाची संधी आहे. आता कुलभूषण यांचे प्राण वाचले असले तरी त्यांच्या सुटकेसाठी मोठा कायदेशीर, राजकीय आणि कूटनितीने संघर्ष करावा लागणार आहे.

कुलभूषण जाधव यांच्या बाजूने आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोश केला. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. आता लवकरात लवकर कुलभूषण भारतात परत यावे अशी इच्छा त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केलेली आहे.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात कैद आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्याने 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्तानमधून अटक केली होती, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र भारताने वारंवार हा दावा फेटाळला होता. कुलभूषण जाधव निवृत्ती घेऊन बिझनेसच्या निमित्ताने इराणला गेले होते. तिथे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं, असं भारताचं म्हणणं आहे.

फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सलर न दिल्याचा आरोप भारताने केला हाता. भारताने पाकिस्तानी सैन्याच्या जाधव यांच्याविरोधातील खटल्याला आव्हानही दिलं होतं. ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.

जाधव यांच्या फाशीला स्थगिती
यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी पुढील कोणताही निर्णय येईपर्यंत पाकिस्तानने कारवाई करु नये, असं सांगत कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 ते 21 फेब्रुवारी 2019 दरम्यान चार दिवस सुनावणी केली होती. यावेळी भारत आणि पाकिस्तानने आपापला युक्तिवाद मांडला होता.

आई आणि पत्नीची भेट
डिसेंबर 2017 च्या शेवटच्या आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईने त्यांची भेट घेतली होती. परंतु पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर  भेटीसाठी बंदी घातली होती. भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने दावा केला होता की, त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि ते रोबोप्रमाणे बोलत होते. भेटीच्या वेळी त्यांच्याच काचेची भिंत होतं. यावर भारताने आक्षेप नोंदवला होता.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

'रॉ'चे हेर असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.

जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत.

कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.

'माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,' असं त्यांचे वडील म्हणाले होते.