वॉशिंग्टन : चीनविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अॅप टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. या आदेशानंतर नंतर अमेरिकेत टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी लागेल.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी(6 ऑगस्ट) संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वीचॅटला 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याआधी अमेरिकन कर्मचाऱ्यांनी टिकटॉक न वापरण्याच्या आदेशाला सीनेटने एकमताने परवानगी दिली होती. बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, "ही बंदी आवश्यक आहे, कारण 'अविश्वासार्ह' अॅप जसं की टिकटॉकमधून डेटा एकत्र करणं हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे."
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "चिनी कम्युनिस्ट पक्षाला डेटा कलेक्शनमुळे अमेरिकेच्या नागरिकांची खासगी आणि मालकी हक्कांसंबंधाची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणं ट्रॅक करण्याची परवानगी मिळते. एवढंच नाही तर कम्युनिस्ट पार्टी वैयक्तिक माहितीचा वापर ब्लॅकमेलिंग किंवा कॉर्पोरेट हेरगिरीसाठी करु शकते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "जर या कंपनीची विक्री झाली नाही तर 15 सप्टेंबरपर्यंत त्यावर अमेरिकेत बंदी येऊ शकते. तसंच जर याची विक्री झाली तर त्याचा वाटा अमेरिकेच्या करदात्यांनाही मिळायला हवा."
टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट आणि वीचॅटच्या मालकांनी कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो बुधवार (5 ऑगस्ट ) म्हटलं होतं की, आम्ही ही कारवाई चिनच्या टेक्नॉलॉजीपासून वैयक्तिक अॅपपर्यंत वाढवत आहोत. पॉम्पियो यांनी टिकटॉक आणि वीचॅटचं नावही घेतलं होतं.
दरम्यान गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारत सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे.