America Air Strike on Somalia : अमेरिकन (America) सैन्याने सोमालिया (Somalia) देशातील दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक (Air Strike) केला आहे. अमेरिकन सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी सोमाली शहरातील अल शबाब दहशतवादी संघटनेला लक्ष्य करत त्यांच्यावर एअर स्ट्राईक केला. इथे सोमालियाचे लष्कर आणि अल शबाब संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोमालियातील दहशतवाद्यांशी लढण्याला अमेरिका सोमालिया सरकारला मदत करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने अनेक वेळा दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.


Al Shabab US Air Strike : दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सोमालियाला अमेरिकेची मदत 


सोमालिया हा पूर्व आफ्रिकेतील देश आहे. येथे दहशतवादी कारवाया सुरु आहे. याविरोधात येथील सरकार अमेरिकन लष्कराची मदत घेत आहे. अमेरिकन लष्कराने सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 260 किमी उत्तर-पूर्वेला गलकाडजवळ एअर स्ट्राईक केला. यूएस आफ्रिका कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकही नागरिक जखमी किंवा ठार झाला नाही. एका संरक्षण अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्याच्या वेळी अमेरिकेचे सैन्य जमिनीवर उपस्थित नव्हते.


गेल्या काही महिन्यामध्ये अमेरिकेचे अनेक हल्ले


सीएनएन वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन सैन्याने गेल्या काही महिन्यांमध्ये सोमालियातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अनेक हल्ले केले आहेत. यामध्ये अल-शबाब संघटनेचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अमेरिकेने सोमालियातील मोगादिशूच्या वायव्येस 218 किलोमीटर अंतरावर हल्ला केला. या हल्ल्यात अल-शबाबचे दोन सदस्य ठार झाले. नोव्हेबर नंतरच्या हल्ल्यात मोगादिशूच्या ईशान्येकडील 285 किमी अंतरावर अल-शबाबचे 17 सैनिक ठार झाले आहेत. डिसेंबरच्या उत्तरार्धात, अमेरिकेच्या दुसर्‍या हल्ल्यात कादेल शहराजवळ अल-शबाबचे सहा सदस्य ठार झाले आहेत.


दहशतवादी संघटना अल शबाब


अल शबाब या दहशतवादी संघटनेचा जगातील धोकादायक दहशतवादी संघटनेच्या यादीत समावेश आहे. ही संघटना अल कायदा, बोको हराम आणि ISIS या सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. अल शबाब दहशतवादी संघटनेने आतापर्यंत अनेक मोठे हल्ले केले आहेत. अल शबाबने दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोक मारले आहेत. अल शबाब संघटनेने सोमालिया, केनिया, युगांडा आणि जिबूतीसह अनेक देशांमध्ये अनेक भीषण हल्ले केले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Somalia Blast : दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा हादरलं सोमालिया; मोगादिशुत कार ब्लास्ट, 100 जण दगावले