Meta Layoff :
कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये झुकेरबर्गने 'मेटा'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय, कंपनीकडून 5 हजार जागांवर भरतीवर करण्यात येणार होती. आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे झुकेरबर्गने सांगितले आहे.
मेटामध्ये सुरू असलेली ही नोकरकपात कंपनीमध्ये सुरू असलेल्या पुनर्रचनाशी निगडीत असल्याचे म्हटले जात आहे. कंपनी आपल्या संरचनेत मोठे बदल करत आहे. तसेच कमी प्राधान्याचे प्रोजेक्ट रद्द करत आहे. याशिवाय कंपनी नोकरभरतीही कमी करणार आहे. 'मेटा'मधून कर्मचारी कपातीच्या निर्णयासोबत व्यवस्थापनातील अनेक स्तर काढून टाकले आहे. मॅनेजर लेव्हलच्या अनेकांना आता वैयक्तिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कंपनीत आता लवकरच नोकरभरती होईल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे प्रत्येकाला अधिक योगदान द्यावे लागेल, असे झुकेरबर्गने म्हटले.
मेटामधील 10,000 कर्मचार्यांच्या नोकरकपातीच्या वृत्तानंतर मेटाचे स्टॉक दर वधारले आहेत. प्री-मार्केट ओपनिंगमध्ये मेटाच्या शेअर दरात 2 टक्क्यांची तेजी दिसून आली.
अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर मंदीचे सावट दिसून येत आहे. त्यातच मेटाचे तिमाही निकालदेखील असमाधानकारक असल्याचे दिसून आले. मेटाला जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्नदेखील घटले असल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये मेटाने 11,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. 2004 मध्ये फेसबुकच्या स्थापनेच्या 18 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे.
लेऑफ-ट्रॅकिंग साइट layoffs.fyi ने दिलेल्या माहितीनुसार, टेक उद्योगाने 2022 च्या सुरुवातीपासून जवळपास 2 लाख 90 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यापैकी सुमारे 40 टक्के कर्मचाऱ्यांना या वर्षीच नोकरी गमवावी लागली आहे.
ट्वीटरमध्ये ही कर्मचारी कपातीचा वरवंटा
ट्वीटर कंपनीने पुन्हा एकदा शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. या कर्मचारी कपातात प्रॉडक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट आणि इंजिनिअर यांचा समावेश आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने मोठ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. खर्चात कपातीचे कारण देत कंपनीने सुमारे 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.