न्यूयॉर्क : विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की एकेकाळी महाभयंकर वाटणाऱ्या रोगांवरही आता औषधोपचार मिळत असल्याचं दिसून येतं. त्यात आता एका नव्या शोधावर काही शास्त्रज्ञ काम करत आहेत. हा शोध म्हणजे मनुष्याचं वय वाढवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आहेत. यांमुळे मनुष्याचं वय वाढून जवळपास 130 वर्ष इतकं होऊ शकतं. हा शोध सुरु असलेल्या कंपनीची स्थापना जगातील काही श्रीमंत व्यक्ती आणि शास्त्रज्ञांनी मिळून केली आहे.


अमेरिका आणि युके येथे या कंपनीची एल्टॉस लॅब ही प्रयोगशाळा असून या ठिकाणी सेल्युलर रिप्रोग्रामिंगद्वारे मनुष्याचं वय वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याने सामान्य मनुष्याचं वय जवळपास 50 वर्षांनी वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्या साधारण 80 वर्ष असणारी वयोमर्यादा 130 वर्षांपर्यंत जाऊ शकते. ही कंपनी स्थाप करणाऱ्यांमध्ये अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजॉस, रशियाचे अरबपती युरी मिल्नर आणि अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर संस्थेचे माजी प्रमुख डॉ. रिक क्लॉजनर यांचाही समावेश आहे. 


याआधीही झाला आहे असा प्रयत्न


आतापासून 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते जपानचे शास्त्रज्ञ डॉ. शिन्या यमानाका यांनी यामानाका ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्सने सर्व जगाला आश्चर्यचकीत करुन सोडलं होतं. मानवी शरीर विविध सेल्स अर्थात पेशींनी बनलेलं असतं. यामानाका यांच्या या ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरमुळे पेशींना अधिक युवा पेशींमध्ये बदलता येऊ शकतं हे समोर आलं होतं. तणाव आणि वयामुळे पेशीही वृद्ध होत असतात. दरम्यान यामानाका हे स्वत: या लॅबमध्ये मदतीसाठी असणार आहेत. त्यामुळे हा प्रयत्न आता कितपत यशस्वी ठरतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha