चार्ल्टसन/बोस्टन : अमेरिकेच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून बर्फाच्या वादळानं थैमान घातलं आहे. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व भागातील तापमानाचा पारा निचांकी पातळीपर्यंत घसरला आहे. तसेच, वादळामुळे आत्तापर्यंत 18 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

या वादळामुळे, उत्तर अमेरिकडे जाणारी आत्तापर्यंत 2700 पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहे. तर अमेरिकेच्या 90 टक्के भागात उणे तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांनी याला ‘बॉम्ब वादळ’ असं नाव दिलं आहे.


हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ फ्लोरिडातून यूरोपमध्ये मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. निचांकी तापमानामुळे अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. नॅशनल व्हेदर सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमध्ये ताशी 90 किमी वेगाने वारे वाहू शकतात. तर बोस्टनमध्ये एक फूट उंचीचा बर्फाचा थर जमण्याची शक्यता आहे.

फोटो सौजन्य : CNN

या वादळामुळे न्यूयॉर्कमधील गुरुवारपासून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालयंदेखील उशीराने सुरु होत आहेत. तसेच जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि व्हर्जिनियामध्ये वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मॅसाच्यूसेट्स, मेन आणि जॉर्जियामध्ये तलावांचं रुपांतर बर्फाच्या जमीनीत झालं आहे.

फोटो सौजन्य : CNN

दुसरीकडे या वादळामुळे चीनमध्ये मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे चीनमधील महत्त्वाची तीन विमानतळं बंद ठेण्यात आली आहेत. तर नऊ विमानतळावर विमानं उशिरानं येत आहेत. तर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, हेनान प्रांतातही मुख्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. शान्शीसह अनेक भागात हायस्पीड ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत.

फोटो सौजन्य : CNN

दरम्यान, संपूर्ण भारतातही गारठा चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीत थंडीमुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी दिल्लीचा पारा ६ अंश सेल्सियसवर आला आहे. तर राजस्थानच्या फतेहपूरमध्ये उणे 1 पुर्णांक 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. श्रीनगरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी उणे 6 पुर्णांक 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जानेवारी महिन्यात थंडी कमी होण्याची अपेक्षा असते, मात्र यंदा राज्याला थंडीनं हुडहुडी भरली आहे. वाढत्या थंडीमुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीमुळे सर्वजण गारठले आहेत.