बिजींग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचे नाव न घेता वाभाडे काढत, पाकिस्तानला दहशतवाद्यांचा जन्मदाता देश असल्याचं संबोधलं. तसेच दहशतवादाविरोधातील लढ्यात ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रित होण्याचे आवाहन केलं होतं. या घटनेला 24 तासही उलटत नाही, तोच चीनने पाकिस्तानच्या बचाव केला आहे.


चीनने पाकिस्तानचा बचाव करताना, कोणत्याही देशाला सरळसरळ धर्म किंवा दहशतवादाशी जोडणे चुकीचे असून चीन याच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानच्या बलिदानाची जगाने दखल घेतली पाहिजे असं आवाहन केले आहे.

गोव्यातील ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा जन्मदाता असल्याचं संबोधलं होतं. त्यावर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी प्रतिक्रिया देताना, कोणत्याही देशाचा संबंध दहशतवादाशी जोडण्याच्या चीन विरोधात असल्याचं म्हटलं आहे.

भारताने पाकिस्तानचं नाव न घेता केलेल्या टीकेसंदर्भात चुनयिंग यांना विचारले असता, ''दहशतवादविरोधी लढ्यात चीनची भूमिका स्पष्ट असून कोणत्याही देशाचा संबंध धर्माशी जोडणे चुकीचं आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आहोत. तसेच याविरोधातील लढ्यात सर्वच देशांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे आम्हलाही मान्य आहे.''

मात्र दुसरीकडे पाकिस्तानचा बचाव करताना, चुनियंग यांनी पाकिस्तानने दहशतवाद विरोधातील लढ्यात दिलेल्या बलिदानाची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली पाहिजे, असे सांगितले. मोदींच्या टीकेवरुन पाकिस्तान भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवादी संघटनांना अर्थिक रसदीसोबत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. यावर आंतरराष्ट्रीय जगताने कोणती पावले उचलवी, या प्रश्नावर चुनियांग यांनी तुमची चिंता समजू शकतो असं उत्तर दिलं.

दहशतवाद विरोधातील लढ्यातील चीनची भूमिका स्पष्ट असल्याचा पुनरुच्चार करुन ते म्हणाले की, ''आम्ही दहशतवादाला कोणत्याही देशाशी किंवा धर्माशी जोडण्याच्या विरोधात आहोत. भारत आणि पाकिस्तान चीनचे शेजारी राष्ट्रे आहेत. या दोन्ही देशांनी चर्चोद्वारे आपपासतले मतभेद दूर करावेत, अशी आमची अपेक्षा आहे.''

संबंधित बातम्या

BRICS संमेलनातही पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानचे वाभाडे

ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये